युवकांनी आधुनिक कलांचा विकास करावा – उपसंचालक उदय जोशीराज्यस्तरीय युवा महोत्सव पुण्यात यशस्वीपणे संपन्न; लातूर व कोल्हापूर विभागाचे वर्चस्व

पुणे, दि. 3 : युवकांचा सर्वांगीण विकास घडवणे, भारतीय संस्कृती व परंपरेचे जतन करणे, युवकांमधील सुप्त कलागुणांना वाव देणे आणि राष्ट्रीय एकात्मता बळकट करण्याच्या उद्देशाने २९ डिसेंबर २०२५ ते १ जानेवारी २०२६ या कालावधीत ग. दि. माडगुळकर नाट्यगृह, निगडी (पिंपरी-चिंचवड) येथे आयोजित सन २०२५-२६ चा राज्यस्तरीय युवा महोत्सव यशस्वीपणे पार पडला.

या महोत्सवाच्या पारितोषिक वितरण समारंभात क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे उपसंचालक उदय जोशी यांनी युवकांनी ‘विकसित भारत २०४७’ या संकल्पनेच्या दिशेने वाटचाल करत आपल्या अंगी असलेल्या आधुनिक कलांचा विकास करावा, असे आवाहन केले. युवकांसाठी स्वतंत्र धोरण तयार करण्यात येत असून त्यामध्ये युवकांच्या मतांना केंद्रस्थानी स्थान दिले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

३१ डिसेंबर २०२५ रोजी झालेल्या या सोहळ्यास उपसंचालक माणिक पाटील, युवराज नाईक, सहायक संचालक मिलिंद दीक्षित, चंद्रशेखर साखरे, जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, ‘मेरा युवा भारत’चे जिल्हा युवा अधिकारी आशिष शेटे तसेच प्रसिद्ध अभिनेत्री सुरभी हांडे प्रमुख उपस्थितीत होत्या.

जिंकलेल्या कलाकारांनी हुरळून न जाता राष्ट्रीय स्तरावर अधिक चांगली कामगिरी करावी, तर पराभूत स्पर्धकांनी खचून न जाता नव्या जोमाने तयारी करावी, असा संदेश श्री. जोशी यांनी दिला. राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी निवड झालेल्या युवक-युवतींना त्यांनी शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी दोन दिवस चाललेल्या स्पर्धांमध्ये कलाकारांनी उत्कृष्ट सादरीकरण केल्याची माहिती दिली. अभिनेत्री सुरभी हांडे यांनी आपल्या अनुभवांची माहिती देत, कलेसोबतच इतर क्षेत्रातही युवकांनी प्रगती करावी, असे सांगितले.

लोकगीत, लोकनृत्य, वक्तृत्व, कथालेखन, काव्यलेखन, चित्रकला व विज्ञान प्रदर्शन या विविध स्पर्धांमध्ये राज्यातील आठ विभागांतील ३१२ युवक-युवतींनी सहभाग घेतला. या स्पर्धांमध्ये लातूर व कोल्हापूर विभागाने विशेष वर्चस्व सिद्ध केले.

या महोत्सवातील विजयी युवक-युवती ८ ते १२ जानेवारी २०२६ दरम्यान दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय युवा महोत्सवात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button