
पुणे, दि. 3 : ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना’ जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी परस्पर समन्वय साधून कामे करावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिले. जिल्हास्तरीय कार्यकारी समितीच्या पुर्वनियोजन बैठकीत ते बोलत होते. यावेळी समिती सदस्य तसेच उपविभागीय अधिकारी उपस्थित होते.
शासन, महसूल व वन विभागाच्या १४ डिसेंबर २०२५ रोजीच्या शासन निर्णयानुसार ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना’ सुरू करण्यात आली आहे. या योजनेसाठी सोपी व सुलभ कार्यपद्धती निश्चित करण्यात आली असून, शेतकऱ्यांना शेतातील पेरणी, आंतरमशागत, कापणी, मळणी तसेच शेतीमाल बाजारात पोहोचविण्यासाठी बारमाही शेतरस्ते उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
या शासन निर्णयानुसार योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यस्तरावर महसूल मंत्री, जिल्हास्तरावर पालकमंत्री आणि विधानसभा क्षेत्रस्तरावर संबंधित विधानसभा सदस्य यांच्या अध्यक्षतेखाली समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. ही योजना महसूल विभागामार्फत राबविण्यात येणार असून ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद (बांधकाम विभाग), प्रधानमंत्री/मुख्यमंत्री ग्रामसडक योजना विभाग तसेच वन विभाग आदी विविध यंत्रणा कार्यान्वयीन यंत्रणा म्हणून काम करणार आहेत.
सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असून, अशी माहिती रोहयो शाखेच्या उपजिल्हाधिकारी डॉ. चारुशीला देशमुख-मोहिते यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.