पुणे महापालिका निवडणुकीच्या तयारीचा मुख्य निवडणूक निरीक्षक राहुल महिवाल यांचा आढावा

पुणे दि. 2 : पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ च्या पार्श्वभूमीवर निवडणूक तयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्य निवडणूक निरीक्षक श्री. राहुल महिवाल (भा.प्र.से.) यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (दि. ०२ जानेवारी २०२६) दुपारी ४.३० वाजता पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभागृहात आढावा बैठक पार पडली.

या बैठकीत पुणे महानगरपालिकेतील विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. तसेच सर्व प्रभागांचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांच्या विभागातील निवडणूक कामकाजाची अद्ययावत माहिती सादर केली.

मुख्य निवडणूक निरीक्षक श्री. राहुल महिवाल यांनी निवडणूक तयारीबाबत समाधान व्यक्त केले. निवडणूक प्रक्रिया ही पूर्णतः निष्पक्ष व पारदर्शी असावी, असे स्पष्ट निर्देश देत त्यांनी आचारसंहिता भंगासंदर्भातील प्रत्येक तक्रारीवर गांभीर्याने व निष्पक्षपणे कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. उपद्रवी घटनांवर तातडीने नियंत्रण मिळवावे तसेच विशेषतः रात्रीच्या वेळी आचारसंहितेचे उल्लंघन होऊ नये यासाठी FST, SST आणि VST पथकांमार्फत अधिक प्रभावी कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले.

तसेच मतदार जागृती (SVEEP) उपक्रम, आचारसंहिता व निवडणूक आयोगाने दिलेल्या सर्व सूचनांची काटेकोर अंमलबजावणी करून निवडणुका आदर्श व पारदर्शी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी निवडणूक निरीक्षक श्री. अरुण आनंदकर यांनी मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याच्या सूचना दिल्या. तसेच सर्व निवडणूक निर्णय अधिकारी, कक्ष प्रमुख, पुणे महानगरपालिकेचे अधिकारी, पुणे व पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त, आयकर आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि प्रादेशिक परिवहन विभाग यांनी परस्पर समन्वय साधून निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडावी, असे निर्देश देण्यात आले.

या बैठकीस निवडणूक निरीक्षक श्री. अरुण आनंदकर, अपर जिल्हाधिकारी, पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त (विशेष) श्री. ओमप्रकाश दिवटे, पोलीस आयुक्त कार्यालयाचे प्रतिनिधी, परिवहन आयुक्त कार्यालयातील अधिकारी, राज्य उत्पादन शुल्क विभाग, आयकर आयुक्त कार्यालयातील अधिकारी तसेच निवडणूक कार्यालयातील विविध कक्षांचे प्रमुख व कर्मचारी उपस्थित होते. सर्व निवडणूक निर्णय अधिकारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button