भाजपचे दोन उमेदवार बिनविरोध नगरसेवक; पुण्यात विजयाची घौडदौड सुरू – महापौर भाजपचाच होणार : मुरलीधर मोहोळ

पुणे : भारतीय जनता पक्षावरील नागरिकांचा वाढता विश्वास पाहता विरोधकांनाही आता वस्तुस्थितीची जाणीव झाली आहे. भाजपच्या पाठीशी असलेल्या जनभावना लक्षात घेता आणि अनामत रक्कम जप्त होण्याची भीती वाटत असल्यानेच विरोधक निवडणुकीतून माघार घेत आहेत. दोन उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने भाजपच्या विजयाची घौडदौड सुरू झाली आहे, असा ठाम विश्वास केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी शुक्रवारी व्यक्त केला. यंदा पुण्याचा महापौर भाजपचाच होईल, तसेच शिवसेनेसह मैत्रीपूर्ण लढत होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सनसिटी माणिकबाग येथील प्रभाग क्रमांक ३५ मधून मंजुषा दीपक नागपुरे आणि श्रीकांत जगताप हे भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून आले. यानिमित्ताने शहर भाजप कार्यालयात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते दोन्ही नगरसेवकांचा सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमाला शहराध्यक्ष धीरज घाटे, आमदार भीमराव तापकीर, दीपक नागपुरे, रवींद्र साळेगावकर, विकास दांगट आदी पदाधिकारी उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली देशात व राज्यात विकासाची मजबूत पायाभरणी झाली आहे. महायुती सरकारच्या माध्यमातून पुण्यात मोठ्या प्रमाणावर विकासकामे सुरू असून त्यामुळे पुणेकरांचा भाजपवरील विश्वास अधिक दृढ होत आहे. विरोधकांकडे सक्षम उमेदवार नसल्यानेच ते माघार घेत आहेत, असे मोहोळ म्हणाले. बिनविरोध निवडून आलेले दोन्ही नगरसेवक तिसऱ्यांदा पालिकेत येत असून त्यांच्या अनुभवाचा फायदा शहराच्या विकासासाठी होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

शिवसेनेसोबत मैत्रीपूर्ण लढत

पालिका निवडणुकीसाठी भाजपने सातत्याने शिवसेनेसह युतीची भूमिका मांडली होती. अनेक चर्चा झाल्या; मात्र काही जागांवर एकमत न झाल्याने पुण्यात शिवसेनेसह मैत्रीपूर्ण लढत होणार आहे. हिंदुत्व आणि विकासाच्या मुद्द्यांवर जनता भाजपच्या पाठीशी असल्याचे मोहोळ यांनी स्पष्ट केले.

समताभूमी येथे प्रचाराचा शुभारंभ

भाजपच्या पुण्यातील प्रचाराचा शुभारंभ शनिवारी (३ जानेवारी) सकाळी ८ वाजता समताभूमी येथे महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करून होणार आहे. यावेळी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह खासदार, आमदार आणि सर्व उमेदवार उपस्थित राहणार असल्याची माहिती शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी दिली.

अदिती बाबर भाजप पुरस्कृत उमेदवार

प्रभाग क्रमांक दोनमधील भाजप उमेदवार पूजा मोरे यांनी माघार घेतल्यानंतर अदिती बाबर यांना भाजपची अधिकृत पुरस्कृत उमेदवारी देण्यात आली आहे. शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या हस्ते त्यांना पाठिंबा पत्र देण्यात आले. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ उपस्थित होते. राहुल जाधव, रेणुका चलवादी आणि सुधीर वाघमोडे हे या प्रभागातील भाजपचे इतर उमेदवार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button