
पुणे : महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आज संपल्यानंतर आता प्रचाराला वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २४ मध्ये सर्वपक्षीय नेते व पदाधिकाऱ्यांचा ओढा मोठ्या प्रमाणावर भारतीय जनता पक्षाकडे वाढताना दिसत आहे.
आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, निवडणूक प्रमुख तसेच प्रभाग क्रमांक २४ चे भाजप उमेदवार गणेश बिडकर यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला.
या पक्षप्रवेशामध्ये पुणे महानगरपालिका मनसे कामगार आघाडीचे प्रमुख रितेश शिकोत्रे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा समावेश होता. याच वेळी भगवान श्री जाहर वीर गोगाजी सेवा समिती आणि महाराष्ट्र महर्षी वाल्मिक महाराज संघटना यांनीही त्यांच्या वतीने भारतीय जनता पार्टी व उमेदवार गणेश बिडकर यांना जाहीर पाठिंबा दिला.
प्रभाग क्रमांक २४ तसेच पुणे शहरासाठी गणेश बिडकर यांनी केलेली विकासकामे, नागरिकांसाठी असलेली त्यांची तळमळ आणि सातत्यपूर्ण कार्य पाहून संपूर्ण ताकदीसह त्यांना पाठिंबा देत असल्याचे मत यावेळी रितेश शिकोत्रे यांनी व्यक्त केले. या घडामोडींमुळे प्रभाग २४ मधील राजकीय समीकरणे बदलताना दिसत असून भाजपची ताकद अधिक बळकट झाल्याचे चित्र आहे.