
पुणे, दि. 2 : नूतन वर्ष २०२६ च्या पहिल्याच दिवशी शिर्डी येथील श्री साईबाबांच्या चरणी एका भाविकाने तब्बल ८० लाख रुपये किमतीचा सुवर्ण मुकुट अर्पण करून आपली भक्ती व्यक्त केली. हैद्राबाद येथील साईभक्त कनका रेड्डी यांनी हा मौल्यवान मुकुट श्री साईबाबा संस्थान ट्रस्टकडे सुपूर्द केला आहे.
या सुवर्ण मुकुटाचे अंदाजे वजन ७०७ ग्रॅम असून त्यावर आकर्षक व मौल्यवान हिर्यांची जडणघडण करण्यात आली आहे. नवीन वर्षाच्या प्रारंभी साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत देशभरातून लाखो भाविकांनी गर्दी केली असून, या दानामुळे मंदिराच्या खजिन्यात मोलाची भर पडली आहे.
श्री साईबाबा संस्थान ट्रस्टकडून या देणगीची अधिकृत नोंद घेण्यात आली असून, ट्रस्टच्या वतीने दानशूर भक्ताचे आभार मानण्यात आले आहेत. साईभक्तांना अशा प्रकारची देणगी संस्थान ट्रस्टच्या अधिकृत संकेतस्थळावरूनही ऑनलाइन स्वरूपात अर्पण करता येते, असे ट्रस्टकडून स्पष्ट करण्यात आले आहे.