
पुणे, दि. 2 : मराठी चित्रपटसृष्टीत नवे विषय, नवे प्रयोग आणि नव्या दमाचे दिग्दर्शक सातत्याने आपली छाप उमटवत आहेत. याच परंपरेत आता शेखर बापू रणखांबे यांचे नाव नव्या दिग्दर्शकांच्या यादीत समाविष्ट झाले आहे. झी स्टुडिओज प्रस्तुत आणि झणकर फिल्म्स निर्मित ‘रुबाब’ या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी दिग्दर्शनात पदार्पण केले आहे. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या चित्रपटाच्या धडाकेबाज टीझरने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले असून, सोशल मीडियावर चित्रपटाबाबत उत्सुकता वाढताना दिसत आहे.
मुंबईत संघर्ष करत करिअरची सुरुवात करणाऱ्या शेखर बापू रणखांबे यांनी अनेक अडचणींवर मात केली. सुरुवातीच्या काळात प्लंबिंगसारखी कामे करत त्यांनी आपला उदरनिर्वाह केला. त्यानंतर रंगभूमीशी नाते जुळले आणि नाटकांच्या बॅकस्टेजवर काम करताना कथाकथन, अभिनय आणि दिग्दर्शनाची शिस्त त्यांनी आत्मसात केली. पुढे त्यांनी दिग्दर्शन व लेखनाकडे वाटचाल करत अनेक चित्रपटांमध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले.
शेखर रणखांबे यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘रेखा’ आणि ‘पॅम्पलेट’ या शॉर्ट फिल्म्सना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली आहे. ‘रेखा’ या शॉर्ट फिल्मला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला असून, प्रसिद्ध दिग्दर्शक रवी जाधव यांनी या शॉर्ट फिल्मची निर्मिती केली होती. तर ‘पॅम्पलेट’ या शॉर्ट फिल्मची निवड इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलच्या इंडियन पॅनोरमा विभागात झाली होती आणि केरळ इंटरनॅशनल डॉक्युमेंट्री व शॉर्ट फिल्म फेस्टिव्हलमध्ये या चित्रपटाला पुरस्कार मिळाला.
‘रुबाब’ ही केवळ प्रेमकहाणी नसून, प्रेम जपताना असलेला स्वाभिमान, ठामपणा आणि आत्मविश्वास यांचे प्रभावी चित्रण करणारा चित्रपट आहे. गावाकडच्या प्रेमकथेचा परिचित विषय असला तरी, त्याची मांडणी आणि दृष्टीकोन वेगळा असल्याचे टीझरमधून स्पष्ट होते.
दिग्दर्शक शेखर बापू रणखांबे म्हणतात,
“‘रुबाब’ हा चित्रपट माझ्यासाठी अत्यंत खास आहे, कारण हा माझा पहिला चित्रपट आहे. झी स्टुडिओज आणि निर्माते संजय झणकर यांनी मला योग्य दिशा आणि व्यासपीठ दिले, त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभारी आहे. कलाकारांनीही उत्कृष्ट काम करत या कथेला न्याय दिला आहे. ‘रुबाब’ ही साधी लव्हस्टोरी नसून त्यामध्ये एक वेगळेपणा आहे. टीझरला मिळणारा प्रतिसाद पाहून खूप आनंद होतो आणि प्रेक्षकांना हा चित्रपट नक्की आवडेल, असा विश्वास आहे.”
चित्रपटात संभाजी ससाणे आणि शीतल पाटील प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. झी स्टुडिओज प्रस्तुत आणि झणकर फिल्म्स निर्मित ‘रुबाब’ या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन शेखर बापू रणखांबे यांनी केले असून संजय झणकर आणि गौरी झणकर निर्माते आहेत. उमेश कुमार बन्सल आणि बवेश जानवलेकर प्रस्तुतकर्ते आहेत.
हा बहुचर्चित चित्रपट ६ फेब्रुवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.