पुणे महापालिका निवडणूक २०२६ : अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर ‘गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारी’वरून तीव्र टीका

पुणे, दि. 2 : पुणे महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना उमेदवारी दिल्याचा आरोप करत विरोधकांनी राष्ट्रवादीवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

सर्वाधिक वादग्रस्त ठरलेली उमेदवारी म्हणजे कुख्यात गुंड गजा मारणे यांची पत्नी जयश्री मारणे यांना बावधन येथील प्रभाग क्रमांक १० मधून दिलेली उमेदवारी. याशिवाय आयुष कोंकर हत्या प्रकरणातील आरोपी आणि सध्या तुरुंगात असलेल्या लक्ष्मी आंदेकर व सोनाली आंदेकर यांनाही उमेदवारी दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आंदेकर कुटुंबाचा गुन्हेगारी इतिहास लक्षात घेता, या निर्णयावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे.

पिंपरी-चिंचवड भागातही अजित पवार गटावर गंभीर आरोप झाले आहेत. ‘हाफ मर्डर’सारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपी असलेल्या सिद्धार्थ बनसोडे यांना उमेदवारी दिल्याचा आरोप करत काँग्रेसने पुराव्यांसह राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे.

या प्रकरणावर भाजप खासदार मुरलीधर मोहोळ यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. “एकीकडे अजित पवार कोयता गँगविरोधात कारवाईच्या बाता करतात, तर दुसरीकडे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना राजकीय आश्रय देतात. हा दुटप्पीपणा पुण्याच्या कायदा-सुव्यवस्थेसाठी घातक आहे,” अशी टीका त्यांनी केली.

विरोधकांच्या आरोपांना उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे. काही जागा युतीतील मित्रपक्षांसाठी, विशेषतः आरपीआय (सचिन खरात गट) यांच्यासाठी सोडण्यात आल्या होत्या. युतीच्या जागावाटपानुसार त्या जागांवरील उमेदवार निवडण्याचा अधिकार संबंधित पक्षाचा असून, राष्ट्रवादी काँग्रेसचा त्यामध्ये कोणताही थेट हस्तक्षेप नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मात्र, या खुलाशानंतरही पुण्याच्या राजकारणात “गुन्हेगारी आणि सत्ता” यांचा संगम होत असल्याचा आरोप थांबलेला नाही. आगामी महापालिका निवडणुकीत हा मुद्दा राष्ट्रवादीसाठी डोकेदुखी ठरणार की, याचा फैसला मतदारच करणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button