नूतन वर्षाच्या स्वागतात ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’विरोधात विशेष मोहिम; पिंपरी-चिंचवडमध्ये २४० वाहनचालकांवर कारवाई

पुणे, दि. 2 : वर्षअखेर व नूतन वर्ष २०२६ च्या स्वागतानिमित्त नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर उत्सव साजरा करण्यात येतो. मात्र या काळात काही वाहनचालक मद्यप्राशन करून वेगात व धोकादायक पद्धतीने वाहने चालवित असल्याने अपघातांची शक्यता वाढते. स्वतःच्या तसेच इतर नागरिकांच्या जीवितास व मालमत्तेस धोका निर्माण होऊ नये, यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडून मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्यांविरुद्ध विशेष प्रतिबंधात्मक मोहिम राबविण्यात आली.

पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या आदेशानुसार तसेच पोलीस सह आयुक्त डॉ. राशीकांत महावरकर व अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांच्या सूचनेनुसार वाहतूक शाखेमार्फत ही विशेष कारवाई करण्यात आली.

या मोहिमेअंतर्गत पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेच्या १३ विभागांमार्फत शहरातील ४७ ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली. या तपासणीदरम्यान मद्यप्राशन करून वाहन चालविणारे २२० दुचाकीस्वार आणि २० चारचाकी वाहनचालक, असे एकूण २४० वाहनचालक आढळून आले. संबंधित सर्व वाहनचालकांविरोधात “ड्रंक अँड ड्राईव्ह” अंतर्गत मा. न्यायालयात खटले दाखल करण्यात येत आहेत.

यापुढील काळातही अशाच प्रकारच्या विशेष मोहिमा राबविण्यात येणार असून, वाहनचालकांनी मद्यप्राशन न करता वाहने चालवावीत व संभाव्य अपघात तसेच न्यायालयीन कारवाई टाळावी, असे आवाहन पोलीस उपायुक्त विवेक पाटील (वाहतूक शाखा, पिंपरी-चिंचवड) यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button