
पुणे दि. 2 : ऐतिहासिक भीमा कोरेगाव विजयस्तंभ शौर्यदिन अभिवादन सोहळा यंदा मोठ्या उत्साहात व पूर्ण शांततेत पार पडला. महाराष्ट्रासह देशभरातून आलेल्या सुमारे २५ लाख आंबेडकरी अनुयायांनी विजयस्तंभाला अभिवादन करून शौर्यदिन साजरा केला. या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन व सर्व अनुयायांचे भीमा कोरेगाव विजयस्तंभ शौर्यदिन समन्वय समितीच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.
१८१८ साली झालेल्या कोरेगाव भीमा लढ्यात शहीद झालेल्या महार सैनिकांच्या स्मरणार्थ पेरणे येथे उभारण्यात आलेल्या विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी दरवर्षी लाखो अनुयायी येथे उपस्थित राहतात. यंदा तब्बल २५ लाख अनुयायांनी उपस्थिती लावत आपल्या पूर्वजांच्या शौर्याला मानवंदना दिली. सकाळी सहा वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन सोहळ्यास सुरुवात केली.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर, रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे, भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष भीमराव आंबेडकर, शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे, आमदार बापू पठारे, माऊली कटके, प्रकाश गजभिये, अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य ॲड. गोरक्षनाथ लोखंडे, भारतीय दलित कोब्रा संघटनेचे ॲड. भाई विवेक चव्हाण, रिपब्लिकन युवा मोर्चाच्या सुवर्णा डंबाळे, रणस्तंभ सेवा समितीचे सर्जेराव वाघमारे, विवेक बनसोडे, युवराज बनसोडे यांच्यासह विविध पक्ष व संघटनांचे मान्यवर उपस्थित होते.
महार सैनिकांची मानवंदना
महार रेजिमेंटमधून निवृत्त झालेल्या सुमारे ३ हजार महार सैनिकांनी सकाळी ९ वाजता विजयस्तंभाला मानवंदना दिली. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या मानवंदना सोहळ्यावेळी पोलीस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, पोलीस उपायुक्त सोमय मुंडे, बार्टीचे महासंचालक सुनील वारे व शौर्यदिन समन्वय समितीचे राहुल डंबाळे उपस्थित होते. पोलीस आयुक्तांनी अनुयायांना शुभेच्छा देत शांततेत पार पडलेल्या सोहळ्याबद्दल समाधान व्यक्त केले.
सुविधांमुळे नागरिक समाधानात
विजयस्तंभ परिसरात बार्टी, जिल्हा परिषद व विविध विभागांमार्फत उभारलेल्या सुविधा नागरिकांसाठी उपयुक्त ठरल्या. विशेषतः जिल्हा परिषदेच्या आरोग्य कक्ष व हिरकणी कक्षाचा महिला व नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर लाभ घेतला.
सभांद्वारे अभिवादन
दुपारी १२ वाजता आनंदराज आंबेडकर यांची सभा तर दुपारी १.३० वाजता भीमराव आंबेडकर यांची सभा पार पडली. शौर्यदिन समन्वय समितीच्या सभेत विजयस्तंभ स्मारकाचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी राहुल डंबाळे व सुवर्णा डंबाळे यांनी केली.
समन्वय समितीच्या वतीने उभारण्यात आलेल्या आराम कक्षाचा सुमारे दोन हजार नागरिकांनी लाभ घेतला. याच ठिकाणी प्रसिद्ध शाहीर राजेंद्र कांबळे यांचा शाहिरी जलसा व भीमा कोरेगाववरील पोवाड्यांचा कार्यक्रम झाला. गायक अमर पुणेकर यांच्या भीमगीतांनी वातावरण भारावून टाकले, तर ज्येष्ठ गायक आनंद शिंदे व शिंदे शाही कुटुंबीयांनी कार्यक्रमाची रंगत वाढवली.