
पुणे दि. 2 : गुन्हेगारांना विदेशात पळून जाण्यास मदत करणाऱ्या गुन्हेगारांचा ‘आका’ बाजूला घेऊन बसणाऱ्यांनी आणि केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्यावर निवडून आलेल्या पुणे शहराच्या सुसंस्कृत खासदारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना राजकारण शिकवू नये, असा जोरदार इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे.
पुणे शहरात झालेल्या निवडणुकीत ‘काठावर’ मिळालेल्या विजयामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाही मोलाचा वाटा आहे, हे विसरू नये, असेही या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. गरज संपली की वैद्याला मरण येऊ द्यायचे, अशी ‘गरज सरो वैद्य मरो’ भूमिका भाजपची नेहमीची राहिली असून ही भूमिका लोकशाहीला आणि राजकीय संस्कृतीला साजेशी नसल्याची टीकाही यावेळी करण्यात आली.
अजितदादा पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील अनुभवी, विकासाभिमुख आणि जनतेच्या प्रश्नांसाठी लढणारे नेते आहेत. त्यांच्यावर टीका करण्याआधी पुण्याच्या खासदारांनी स्वतःच्या कार्याचा आणि राजकीय भूमिकेचा आत्मपरीक्षण करावे, असा सल्लाही देण्यात आला आहे.
यापुढे अजितदादा पवार यांच्यावर कोणत्याही प्रकारची बेताल, खालच्या पातळीवरची किंवा राजकीय हेतूने प्रेरित टीका झाल्यास, त्याला ‘जशास तसे’ उत्तर दिले जाईल, असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिला आहे.