क्रांतिज्योतीच्या टिमकडून पुण्यातील सिग्नल स्कूलमधील विद्यार्थ्यांसाठी ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ चित्रपटाचा खास शो

पुणे, दि. 2 : बहुचर्चित ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ हा मराठी चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांकडून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मराठी भाषेचे महत्त्व, शिक्षणव्यवस्था आणि सामाजिक वास्तव यांचा प्रभावी वेध घेणाऱ्या या चित्रपटाने सर्व स्तरातील प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेतले आहे. सध्या या चित्रपटाचे प्रमोशन संपूर्ण महाराष्ट्रभर जोरात सुरू आहे.

मराठी भाषा आणि शिक्षणाबाबत सातत्याने सकारात्मक विचार मांडणारे दिग्दर्शक हेमंत ढोमे आणि त्यांच्यासारखेच समविचारांचे ॲड. अभिजीत पोखरणीकर यांच्या सहकार्याने पुण्यात एक स्तुत्य सामाजिक उपक्रम राबवण्यात आला. ॲड. अभिजीत पोखरणीकर हे एज्युकेअर दादाची शाळा एज्युकेशनल ट्रस्टचे संस्थापक असून, ही संस्था पुण्यातील सिग्नल स्कूलमधील मुलांचे शिक्षण व संगोपन करते.

चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान चलचित्र मंडळी यांच्या वतीने आणि एज्युकेअर दादाची शाळा एज्युकेशनल ट्रस्ट यांच्या सहकार्याने सिग्नल स्कूलमध्ये शिक्षण घेणाऱ्या १०० विद्यार्थ्यांना ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ हा चित्रपट दाखवण्यात आला. पुण्यातील राहुल थिएटर येथे विद्यार्थ्यांनी हा चित्रपट पाहिला.

विशेष बाब म्हणजे, या विद्यार्थ्यांनी पहिल्यांदाच चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहण्याचा अनुभव घेतला. चित्रपट पाहताना त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि उत्साह पाहण्यासारखा होता. या मुलांसाठी हा अनुभव अत्यंत भावनिक आणि अविस्मरणीय ठरला.

‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ या चित्रपटात दिग्गज अभिनेते सचिन खेडेकर मुख्याध्यापकाच्या भूमिकेत झळकणार असून, त्यांच्यासोबत अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर, क्षिती जोग, कादंबरी कदम, हरीश दुधाडे, पुष्कराज चिरपुटकर, निर्मिती सावंत आणि मराठी चित्रपटसृष्टीत पहिल्यांदाच पदार्पण करणारी प्राजक्ता कोळी अशी दमदार स्टारकास्ट पाहायला मिळते.

चलचित्र मंडळी निर्मित या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन हेमंत ढोमे यांनी केले असून, क्षिती जोग या चित्रपटाच्या निर्माती आहेत. तर विराज गवस, उर्फी काझमी (क्रेझी फ्यू फिल्म्स) आणि अजिंक्य ढमाळ हे सहनिर्माते आहेत. सामाजिक जाणीव जपणारा आणि शिक्षणावर भाष्य करणारा हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनाला स्पर्श करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button