पुण्याचा महापौर पुन्हा भाजपाचाच होणार – केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ

पुणे, दि. 2 : केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून पुणे शहरात मोठ्या प्रमाणावर विकासकामे करण्यात आली असून आगामी महापालिका निवडणुकीत पुणेकर पुन्हा एकदा विकासालाच साथ देतील. त्यामुळे पुण्याचा महापौर पुन्हा भाजपाचाच होईल, असा ठाम विश्वास केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केला.

बाजीराव रस्ता येथील भारत भवन येथे पुणे शहर भाजप माध्यम कक्षाचे उद्घाटन केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि महाराष्ट्र प्रदेश भाजपचे मुख्य प्रवक्ता केशव उपाध्ये यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी माजी मंत्री दिलीप कांबळे, भाजप प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, आमदार योगेश टिळेकर, माजी आमदार जगदीश मुळीक, भाजप प्रवक्ते संदीप खर्डेकर, पश्चिम महाराष्ट्र माध्यम प्रमुख अमोल कविटकर, संजय मयेकर, पुष्कर तुळजापूरकर आदी उपस्थित होते.

मोहोळ म्हणाले, केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि राज्य सरकारच्या माध्यमातून पुण्यात मेट्रो विस्तार, सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्यासाठी ई-बससेवा, २४/७ पाणीपुरवठा योजना, वैद्यकीय महाविद्यालय, पुणे-लोणावळा तिसरा व चौथा मार्ग, विमानतळाचे नवे टर्मिनल, चांदणी चौकाचे विस्तारीकरण यांसारखी अनेक महत्त्वाची पायाभूत कामे झाली आहेत. पुण्याला विकासाच्या दिशेने नेण्याचा भाजपचा सातत्यपूर्ण प्रयत्न असून मनपा निवडणूक पूर्ण ताकदीने लढवली जात आहे.

आगामी मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे भाजप मीडिया सेंटर सुरू करण्यात आले असून पुढील १५ दिवसांत या माध्यम कक्षातून पक्षाची अधिकृत माहिती प्रसारमाध्यमांना दिली जाणार आहे. भाजप, शिवसेना आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय) यांची निवडणुकीत युती असून महिलांना मोठ्या प्रमाणावर प्रतिनिधित्व देण्यात आले आहे. कायद्यानुसार ५० टक्के आरक्षण असतानाही भाजपने तब्बल ९२ महिला उमेदवारांना उमेदवारी दिल्याचे मोहोळ यांनी सांगितले.

शिवसेनाला १६ जागा देण्यास भाजप तयार

युतीबाबत बोलताना मोहोळ म्हणाले, भाजपने शिवसेनेला १६ जागा देण्याची तयारी दर्शवली होती. मात्र जागावाटपावर मतभेद झाल्याने हा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली वरिष्ठ पातळीवर घेतला जात आहे. आरपीआयला ८ जागा देण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

गुन्हेगारांना राजकारणात स्थान नको

काही पक्षांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबीयांना उमेदवारी दिल्याच्या आरोपांवर बोलताना मोहोळ म्हणाले, गुन्हेगारांना राजकारणात स्थान नसावे ही भाजपची स्पष्ट भूमिका आहे. भाजपने विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवली असून पुणेकर योग्य निर्णय मतपेटीतून देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button