
पुणे, दि. 2 : आलिशान गाड्या, महागडे ताफे आणि झगमगाट यांची चर्चा निवडणूक काळात नेहमीच ऐकायला मिळते. पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांसाठी उमेदवारांची प्रतिज्ञापत्रे जाहीर झाल्यानंतर अनेक उमेदवारांच्या कोट्यवधींच्या वाहनसंपत्तीची चर्चा रंगली आहे. मात्र, या सगळ्या झगमगाटात प्रभाग क्रमांक २५ मधील भाजपचे उमेदवार राघवेंद्र (बाप्पु) मानकर यांची एक वेगळीच ‘माणुसकीची गाडी’ नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे.
प्रतिज्ञापत्रानुसार बाप्पु मानकर यांच्या नावावर एकही आलिशान चारचाकी नसून त्यांच्याकडे केवळ एक रुग्णवाहिका आहे. विशेष म्हणजे ही रुग्णवाहिका केवळ कागदोपत्री नसून, त्यांच्या २४ तास सुरू असलेल्या जनसंपर्क कार्यालयामार्फत गरजू नागरिकांच्या सेवेसाठी नियमितपणे कार्यरत आहे.
राघवेंद्र बाप्पु मानकर हे भाजपाच्यावतीने प्रभाग २५, शनिवार पेठ – महात्मा फुले मंडई परिसरातून निवडणूक लढवत आहेत. रुग्णवाहिकेसोबत त्यांच्या नावावर एक साधी दुचाकी असून, दैनंदिन जनसंपर्कासाठी ते प्रामुख्याने दुचाकीचाच वापर करतात. त्यामुळे नागरिकांशी थेट संवाद साधता येतो आणि परिसरातील प्रश्न प्रत्यक्ष समजतात, असे ते सांगतात.
आलिशान गाड्यांचे ताफे आणि खर्चिक राजकारणाच्या पार्श्वभूमीवर मानकर यांचा साधेपणा आणि सेवाभावी दृष्टिकोन चर्चेचा विषय ठरत आहे.
याबाबत बोलताना बाप्पु मानकर म्हणाले,
“गुढीपाडव्याला वाहन खरेदी करण्याची परंपरा आहे. २०२३ साली आम्ही रुग्णवाहिका खरेदी केली आणि तीच माझ्या मालकीची एकमेव चारचाकी आहे. रुग्णसेवेच्या कामासाठी तिची गरज होती. पुढेही गुढीपाडव्याच्या निमित्ताने नागरिकांच्या सेवेसाठीच वाहन खरेदी करण्याचा मानस आहे. एक दुचाकी आहे आणि शक्य तिथे त्यावरच फिरतो. त्यामुळे लोक भेटतात, प्रश्न समजतात. लांबच्या प्रवासासाठी मित्रांच्या वाहनांची मदत घेतो.”
निवडणुकीतील दिखाव्याच्या राजकारणात ‘माणुसकीने श्रीमंत’ असलेला हा उमेदवार नागरिकांमध्ये सकारात्मक चर्चेचा विषय बनत आहे.