
पुणे, दि. 1 : महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रचार, बैठका आणि राजकीय समीकरणांचा धडाका सुरू असतानाही प्रभाग क्रमांक २४ ‘ड’ चे उमेदवार व माजी सभागृह नेते गणेश बिडकर यांनी राजकारणापलीकडची माणुसकी आणि जिव्हाळ्याची नाती जपण्याचे दर्शन घडवले आहे. पुणे शहराच्या राजकीय व सामाजिक जीवनात मोलाचे योगदान देणाऱ्या दिवंगत नेत्यांच्या कुटुंबीयांची त्यांनी आज सदिच्छा भेट घेतली.
गणेश बिडकर यांनी दिवंगत माजी महापौर स्व. मोहनसिंग राजपाल यांच्या निवासस्थानी जाऊन राजपाल कुटुंबीयांची भेट घेतली. मोहनसिंग राजपाल महापौर असताना गणेश बिडकर यांना स्थायी समिती अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाली होती. या आपुलकीच्या भेटीत त्या काळातील आठवणींना उजाळा मिळाला.
यावेळी कुटुंबीयांशी संवाद साधताना गणेश बिडकर म्हणाले,
“स्वर्गीय मोहनसिंग राजपाल यांचा प्रदीर्घ अनुभव, शिस्तबद्ध कार्यपद्धती आणि सर्वसमावेशक, संयमी स्वभाव जवळून अनुभवण्याची संधी मिळाली. पुण्याचे पहिले शीख महापौर म्हणून त्यांनी घेतलेले अनेक दूरदृष्टीपूर्ण व धाडसी निर्णय आजही शहराच्या विकासासाठी दिशादर्शक ठरत आहेत.”
तसेच, काँग्रेसचे माजी नगरसेवक स्व. सीतारामभाऊ थोपटे आणि माजी नगरसेविका स्व. शोभाताई बारणे यांच्या निवासस्थानीही गणेश बिडकर यांनी भेट देत कुटुंबीयांशी संवाद साधला आणि त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
निवडणूक म्हणजे केवळ सत्ता, आकडेमोड किंवा राजकीय संघर्ष नव्हे, तर शहराच्या जडणघडणीत योगदान देणाऱ्या नेत्यांचा सन्मान आणि त्यांच्या कुटुंबीयांशी आपुलकी जपणेही तितकेच महत्त्वाचे असते, हे या भेटीतून अधोरेखित झाले.
राजकारणापलीकडची नाती जपणाऱ्या गणेश बिडकर यांच्या या संवेदनशील कृतीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.