विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

पुणे, दि. 1 : पेरणे फाटा येथे १ जानेवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेला विजयस्तंभ अभिवादन सोहळा शांतता, शिस्त आणि उत्साहात पार पडावा यासाठी प्रशासनाने सर्वंकष तयारी केली असून आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.

दरवर्षी मोठ्या प्रमाणावर अनुयायी उपस्थित राहणाऱ्या या ऐतिहासिक सोहळ्यासाठी यंदा अधिक गर्दी अपेक्षित धरून सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. सर्व अनुयायांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि विविध विभागांमध्ये समन्वय ठेवून काम केले जात असल्याचे जिल्हाधिकारी डुडी यांनी सांगितले. सोहळा शांतता, संयम आणि सौहार्दाच्या वातावरणात पार पडावा, असे आवाहनही त्यांनी केले.

जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आरोग्य, स्वच्छता, पिण्याचे पाणी, शौचालये, रुग्णवाहिका, हिरकणी कक्ष, सफाई व्यवस्था आदी सुविधा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. रस्ते दुरुस्ती, पाणी भरण्याची ठिकाणे आणि स्वच्छतेसाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पुणे शहर पोलीस, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय तसेच ग्रामीण पोलीस प्रशासनाकडून हजारो पोलीस अधिकारी, कर्मचारी, होमगार्ड, राज्य राखीव पोलीस दल, शिघ्र प्रतिसाद दल आणि बीडीडीएस पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. संपूर्ण परिसरावर नजर ठेवण्यासाठी अत्याधुनिक सीसीटीव्ही, फेस रिकग्निशन यंत्रणा, ड्रोन कॅमेरे आणि ध्वनीक्षेपण प्रणाली वापरण्यात येत आहेत.

वाहतूक व्यवस्थेसाठी स्वतंत्र वाहनतळ, पिकअप-ड्रॉप पॉइंट्स, पीएमपीएमएल बससेवा तसेच वाहतूक वळविण्याचे आदेश लागू करण्यात आले आहेत. पीएमपीएमएलमार्फत ३१ डिसेंबर आणि १ जानेवारी रोजी एकूण १ हजार ६३५ बसेसचे नियोजन करण्यात आले असून हजारो कर्मचारी तैनात राहणार आहेत.

बार्टीमार्फत ३१० बुक स्टॉल्स, तर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून विजयस्तंभ सजावट, रोषणाई, मंडप, पत्रकार कक्ष आणि परिसर सुशोभीकरणाची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. विद्युत पुरवठ्यासाठी महावितरण व विद्युत विभाग सज्ज ठेवण्यात आला आहे.

प्रशासनाच्या या व्यापक नियोजनामुळे विजयस्तंभ अभिवादन सोहळा सुरक्षित, शिस्तबद्ध आणि ऐतिहासिक ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button