
पुणे दि. 1 : भारतीय रेल्वेच्या इतिहासात एक महत्त्वाचा टप्पा ठरणारी पहिली स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस लवकरच प्रवाशांच्या सेवेत येण्याची शक्यता आहे. ही अत्याधुनिक ट्रेन दिल्ली–पटना (पटना जंक्शन) या महत्त्वाच्या मार्गावर धावेल, अशी माहिती समोर येत आहे.
या स्लीपर वंदे भारत ट्रेनचा पहिला प्रोटोटाईप सप्टेंबर २०२४ मध्ये लाँच करण्यात आला होता. त्यानंतर मुंबई–अहमदाबाद मार्गावर यशस्वी चाचण्या पूर्ण करण्यात आल्या असून सध्या कोटा–नागदा सेक्शनमध्येही चाचणी सुरू आहे. चाचण्या समाधानकारक ठरल्यानंतर या ट्रेनचे नियमित परिचालन २०२६ च्या सुरुवातीस सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याआधी ती दिवाळी २०२५ च्या आसपास सुरू होईल असा अंदाज होता, मात्र आता वेळापत्रक थोडे पुढे ढकलले गेले आहे.
ही स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस प्रवाशांना आरामदायक स्लीपर बर्थ, विमानसदृश आधुनिक इंटीरियर, तसेच उच्च दर्जाच्या सुविधा देणार आहे. फर्स्ट एसी कोचमध्ये गरम पाण्याची शॉवर सुविधा, मॉड्यूलर पॅन्ट्री, तसेच VCD (Vigilance Control Device) आणि अग्नि संसूचन प्रणाली यांसारखी प्रगत सुरक्षा यंत्रणा यात असणार आहे.
या ट्रेनची निर्मिती BEML आणि इंटिग्रल कोच फॅक्टरी (ICF) यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आली आहे. वेग, सुरक्षितता आणि आराम यांचा संगम असलेली ही ट्रेन भारतीय रेल्वे प्रवासात एक मोठा बदल घडवून आणेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.