‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा मोठा अपडेट: ३१ डिसेंबरपासून हप्ता जमा, काहींना थेट ४,५०० रुपये!

पुणे दि. 1 : नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच राज्यातील लाखो महिलांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. १ जानेवारी २०२६ रोजी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी महत्त्वाचा अपडेट जाहीर झाला आहे.

राज्यातील अनेक पात्र महिलांच्या बँक खात्यांमध्ये नोव्हेंबर महिन्याचा १,५०० रुपयांचा हप्ता ३१ डिसेंबर २०२५ च्या रात्रीपासून जमा होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे नवीन वर्षाचे स्वागत महिलांना आर्थिक दिलास्यासह झाले आहे.

दरम्यान, काही तांत्रिक अडचणींमुळे गेल्या तीन महिन्यांपासून लाभ न मिळालेल्या महिलांच्या खात्यात नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या तिन्ही महिन्यांचे एकत्रित ४,५०० रुपये जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे अनेक महिलांना एकाच वेळी मोठा दिलासा मिळाला आहे.

महत्त्वाचे म्हणजे, ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत ई-केवायसी (e-KYC) पूर्ण केलेल्या महिलांच्याच खात्यात सध्या हे पैसे जमा होत आहेत. ज्यांनी अद्याप ई-केवायसी पूर्ण केलेली नाही, त्यांना तातडीने ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, उर्वरित पात्र महिलांच्या खात्यात प्रलंबित हप्ते १४ जानेवारी २०२६ रोजी मकर संक्रांतीपूर्वी जमा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत सर्व पात्र महिलांना योजनेचा लाभ मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button