
पुणे : शब्दांवाचून कळले सारे…, शुक्रतारा मंदवारा…, निज माझ्या नंदलाला रे… अशा अजरामर मराठी गीतांनी रसिकांच्या मनाचा ठाव घेत विद्यार्थी साहाय्यक समितीतर्फे आयोजित ‘शतजन्म शोधताना’ या लाईव्ह कॉन्सर्टचा दहावा प्रयोग मोठ्या उत्साहात पार पडला. गणेश कला क्रीडामंच येथे झालेल्या या सांस्कृतिक सोहळ्याला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
सॅब इव्हेंट्स प्रस्तुत आणि संगीतकार-दिग्दर्शक देवेंद्र भोमे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या कार्यक्रमात अभिनेत्री व कवयित्री स्पृहा जोशी यांच्या ओघवत्या निवेदनाने कार्यक्रमाला भावनिक उंची प्राप्त झाली. दिग्गज गीतकार व संगीतकारांच्या अजरामर रचना, त्यामागील आठवणी व किस्से यांमुळे संपूर्ण मैफल रसिकांसाठी संस्मरणीय ठरली.
कार्यक्रमास समितीचे अध्यक्ष प्रतापराव पवार, कार्यकारी विश्वस्त तुषार रंजनकर, प्रायोजक भूषण वाणी, विश्वस्त, देणगीदार, माजी विद्यार्थी व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मध्यंतरात कलाकार व प्रायोजकांचा सत्कार करण्यात आला. तसेच समितीच्या नवीन माहितीपटाचे आणि अमेरिकेत सुरू झालेल्या विद्यार्थी साहाय्यक समिती फाउंडेशनच्या वेबसाईटचे उद्घाटन करण्यात आले.
ग. दि. माडगूळकर, पु. ल. देशपांडे, मंगेश पाडगावकर, सुधीर फडके, वसंत देसाई, राम कदम यांसारख्या दिग्गजांच्या अजरामर रचनांचे सादरीकरण झाले. मुक्ता जोशी, आशुतोष मुंगळे, जयदीप वैद्य, राजेश्वरी पवार, शमिका भिडे, भूषण मराठे यांच्या गायनाने रसिक मंत्रमुग्ध झाले. तेरा वर्षीय व्हायोलिनवादक रितिका जोगळेकर हिच्या सादरीकरणाला विशेष दाद मिळाली.
भीमपलास रागातील ‘इंद्रायणी काठी, देवाची आळंदी’ या अभंगाने कार्यक्रमाची भावपूर्ण सांगता झाली. मराठी गीतांचा अमूल्य सांस्कृतिक ठेवा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न असल्याचे देवेंद्र भोमे यांनी सांगितले. समितीच्या कार्याला अधिक हातभार लावण्यासाठी दानशूरांनी पुढे यावे, असे आवाहन भूषण वाणी यांनी केले.