
पुणे : महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २४ (कसबा गणपती – कमला नेहरू हॉस्पिटल – केईएम हॉस्पिटल) हा राजकीयदृष्ट्या अधिकच महत्त्वाचा ठरत असून, येथे भारतीय जनता पक्षाला मिळणारा पाठिंबा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि प्रभागाचे निवडणूक प्रमुख गणेश बिडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला.
गेल्या अनेक वर्षांपासून गणेश बिडकर यांनी प्रभागात सातत्याने राबवलेल्या विकासकामांमुळे त्यांच्या नेतृत्वावर सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास अधिक दृढ झाला आहे. याच विश्वासातून मनसेच्या अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
भाजपमध्ये प्रवेश केलेल्यांमध्ये मनसेचे उपविभाग प्रमुख रवी उर्फ बंडू भोसले, शाखा अध्यक्ष प्रशांत गायकवाड तसेच प्रीतम गायकवाड, योगेश पाष्टे, अजय चव्हाण, संतोष टिळेकर यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांचा समावेश आहे. या प्रवेशांमुळे प्रभागातील राजकीय समीकरणे भाजपच्या बाजूने अधिकच झुकत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
मनसेत कार्यरत असतानाच रवी उर्फ बंडू भोसले हे ‘वीरचक्र मित्र मंडळा’च्या माध्यमातून सामाजिक कार्यात सक्रिय होते. युवकांचे संघटन, विविध सामाजिक उपक्रम आणि थेट नागरिक संपर्क ही त्यांच्या कार्यपद्धतीची ओळख राहिली आहे. त्यांच्या भाजप प्रवेशामुळे गणेश बिडकर यांना मिळणारा स्थानिक पाठिंबा अधिक बळकट होत आहे.
प्रवेशावेळी बोलताना रवी उर्फ बंडू भोसले म्हणाले,
“गणेश बिडकर यांनी प्रभागात केलेल्या विकासकामांमुळे नागरिकांमध्ये विश्वास निर्माण झाला आहे. कमला नेहरू आणि केईएम हॉस्पिटलसारख्या महत्त्वाच्या रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून दिलेल्या सुविधांमुळे सामान्य नागरिकांना आरोग्यसेवा सुलभ झाली आहे. ‘लाईट हाऊस’सारख्या उपक्रमांमुळे महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. हे सर्व प्रत्यक्ष काम पाहता, प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी गणेश बिडकर हेच योग्य नेतृत्व आहेत.”