भीमा कोरेगाव विजयस्तंभ अभिवादनासाठी यंदा उच्चांकी गर्दी होणार – राहुल डंबाळे

पुणे : कोरेगाव भीमा युद्धातील शहीद झालेल्या शूरवीरांना अभिवादन करण्यासाठी दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा होणाऱ्या भीमा कोरेगाव विजयस्तंभ शौर्य दिन अभिवादन सोहळ्यात यावर्षी उच्चांकी गर्दी होणार असल्याची खात्री समन्वय समितीचे अध्यक्ष राहुल डंबाळे यांनी व्यक्त केली.

जिल्हा प्रशासनाच्या वतीने अनुयायांसाठी अत्यंत चांगल्या पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असून त्याची संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. समाज माध्यमे व वृत्तपत्रांमधून प्रसिद्ध झालेल्या बातम्यांमुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्साह निर्माण झाला असून, यंदा विक्रमी संख्येने अनुयायी अभिवादनासाठी येणार असल्याची माहिती डंबाळे यांनी दिली.

उत्सव यशस्वी व्हावा व अनुयायांना जास्तीत जास्त सुविधा मिळाव्यात यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील प्रशासकीय समिती, पोलीस विभाग, जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग, पीएमपीएमएल, महसूल विभाग यांसह विविध विभागांचे २२ हजारांहून अधिक शासकीय व निमशासकीय अधिकारी व कर्मचारी मनोभावे काम करत आहेत. आंबेडकरी चळवळीच्या वतीने या सर्व कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात येत असल्याचे डंबाळे यांनी सांगितले.

एवढ्या मोठ्या संख्येने शासकीय व निमशासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सहभागातून साजरा होणारा आंबेडकरी चळवळीचा हा देशातील एकमेव उत्सव असल्याने प्रशासनाचे कौतुक करावे तितके थोडेच आहे, अशी भावना देखील त्यांनी व्यक्त केली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शंभर वर्षांपूर्वी या ठिकाणी स्वतः उपस्थित राहून विजयस्तंभाला अभिवादन केले होते. त्यामुळे आपणही येथे येऊन अभिवादन करावे, हीच सकारात्मक भावना सर्व अनुयायांमध्ये आहे. तसेच पोलीस विभागाकडून आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून समाजकंटकांवर तसेच समाज माध्यमांवरील नकारात्मक पोस्ट्सवर कडक कारवाई करण्यात येत असल्यामुळे यंदा उत्सवावर कोणताही तणाव जाणवत नसून, त्याचा थेट फायदा उत्सवाला होत आहे.

कोणत्याही अफवांना बळी न पडता नागरिकांनी शांततेच्या वातावरणात जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने राहुल डंबाळे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button