उमेदवारी अर्ज भरल्यानंतर काही तासांतच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) उमेदवार जावेद पठाण यांचे हृदयविकाराने निधन

पुणे दि. 31 : मीरा-भाईंदर महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार गट) उमेदवार जावेद पठाण यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे.

३० डिसेंबर २०२५ रोजी जावेद पठाण यांनी प्रभाग क्रमांक २२ मधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र अर्ज भरल्यानंतर अवघ्या काही तासांतच त्यांना अचानक तीव्र हृदयविकाराचा झटका आला. तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असले तरी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

जावेद पठाण हे ६६ वर्षांचे होते. त्यांच्या अकस्मात निधनामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह संपूर्ण मीरा-भाईंदर परिसरात शोककळा पसरली आहे. निवडणूक प्रचाराला वेग येत असतानाच घडलेल्या या घटनेने राजकीय वातावरणातही हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी जावेद पठाण यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले असून त्यांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत. एका सक्रिय राजकीय कार्यकर्त्याचा असा अचानक अंत झाल्याने स्थानिक राजकारणावरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button