“कुठे कमी पडलो साहेब?” म्हणत कार्यकर्त्याने आमदारापुढे फोडला हुंदका; संभाजीनगरमध्ये उमेदवारी अर्जाच्या शेवटच्या दिवशी भावनिक दृश्य

पुणे दि. 31  छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी राजकीय वातावरण चांगलेच तापले असतानाच भाजप कार्यालयात एक भावनिक दृश्य पाहायला मिळाले. भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते प्रशांत भदाणे यांना अधिकृत उमेदवारीचा ‘एबी फॉर्म’ न मिळाल्याने ते अत्यंत व्यथित झाले होते.

“मी कुठे कमी पडलो साहेब?” असे म्हणत प्रशांत भदाणे यांनी भाजप आमदार संजय केनेकर यांच्यासमोर आपल्या भावना व्यक्त केल्या. उमेदवारी नाकारल्याच्या वेदनेने त्यांना रडू अनावर झाले. अनेक वर्षांच्या पक्षसेवेचा दाखला देत त्यांनी आपली खंत मांडली.

आपल्या कार्यकर्त्याला अशा अवस्थेत पाहून आमदार संजय केनेकर हे देखील भावूक झाले. त्यांनी भदाणे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. “पक्षात प्रत्येक कार्यकर्त्याचे योगदान महत्त्वाचे आहे. ही केवळ एक निवडणूक आहे, पक्ष तुमच्याशिवाय अपूर्ण आहे,” असे म्हणत त्यांनी त्यांना धीर दिला.

दरम्यान, महानगरपालिका निवडणुकीसाठी अनेक इच्छुकांना पक्षाचा अधिकृत ‘एबी फॉर्म’ न मिळाल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष पसरल्याचे चित्र आहे. याच असंतोषाचे प्रतिबिंब अशा भावनिक दृश्यांमधून उमटताना दिसत आहे.

उमेदवारी अर्जाच्या शेवटच्या दिवशी पक्षांतर्गत नाराजी, भावनिक उद्रेक आणि नेतृत्वासमोर उघडपणे व्यक्त होणारी खंत यामुळे संभाजीनगरचे राजकीय वातावरण अधिकच ढवळून निघाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button