
पुणे दि. 31 : ‘मै कतराही सही, मेरा वजूद तो है, दुवा करे जो समंदर मेरी तलाश मे है’ अशा अस्खलित उर्दू गजल, नज्म आणि मुक्तकांच्या माध्यमातून अष्टपैलू कलाकार सचिन पिळगावकर यांचा शायराना अंदाज पुणेकर रसिकांसमोर खुलला. त्यानंतर कवी-गीतकार वैभव जोशी यांच्या ‘सोबतीचा करार’ या सादरीकरणाने मराठी गजल, कविता आणि भावविश्वाचा सुंदर ठसा उमटवत ‘आईना-ए-गजल’ ही विशेष मैफल अविस्मरणीय ठरली.
डाॅ. विनय वाईकर स्मृतिप्रित्यर्थ नवी पेठेतील एस. एम. जोशी सभागृहात दिवसभर या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सचिन पिळगावकर यांच्या हस्ते डाॅ. वाईकर लिखित ‘आईना-ए-गजल’ आणि ‘गुलिस्ता-ए-गजल’ या पुस्तकांचे प्रकाशन झाले. कार्यक्रमाला कवी वैभव जोशी, संयोजक अमित वाईकर, अपर्णा वाईकर, गजलकार सुरेशकुमार वैराळकर आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन मिलिंद कुलकर्णी यांनी केले.
‘अंदाज-ए-शायरी’ या संवादात्मक सत्रातून सचिन पिळगावकर यांच्यातील उर्दूप्रेमी शायर आणि संवेदनशील कलाकाराचे दर्शन घडले. उर्दूवरील प्रेम अभिनेत्री मीनाकुमारी आणि शायर मजरूह सुलतानपुरी यांच्यामुळे निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले. ‘आजकल चलता है खूब मेरा बोलबाला…’ अशा हलक्याफुलक्या रचनांनी रसिकांनी दाद दिली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला ‘मुशायरा गझलरंग’मध्ये वैभव जोशी, वैभव देशमुख, ममता सपकाळ आणि ज्ञानेश पाटील यांनी सादरीकरण केले. सुरेशकुमार वैराळकर यांच्या ओघवत्या निवेदनाने कार्यक्रमाला विशेष रंगत आली. दुसऱ्या सत्रात राजेश रेड्डी यांनी ‘बज्म-ए-सुखन’ सादर करत शायरीतून वेगळा विचार मांडला.
तिसऱ्या सत्रात गायिका प्राजक्ता सावरकर शिंदे यांनी ‘नग्मा-ए-गजल’ अंतर्गत गजल सादर केल्या. नासिर काझमी, शकील बदायुनी, राजेश रेड्डी तसेच वैभव जोशी यांच्या गजलांनी रसिकांच्या अंतःकरणाला स्पर्श केला.
मैफलीची सांगता वैभव जोशी यांच्या ‘सोबतीचा करार’ने झाली. ‘सोबतीचा तरी करार करू…’ पासून सुरू झालेला हा भावप्रवास ‘आयुष्याला घाबरण्याचा स्वभाव नाही आई’ या रचनेपर्यंत पोहोचत भैरवीवर विसावला.