
पुणे दि. 31: पेरणे फाटा येथील विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी भीमा कोरेगाव येथे जाणाऱ्या अनुयायांनी ठरवून दिलेल्या मार्गांचाच वापर करावा, असे आवाहन पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वाहतूक विभागाकडून करण्यात आले आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि सुव्यवस्था राखण्यासाठी विविध दिशांतून येणाऱ्या अनुयायांसाठी पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आले आहेत.
मुंबई, नवी मुंबई व ठाणे परिसरातून बसेसद्वारे येणाऱ्या अनुयायांनी तळेगाव–चाकण–शिक्रापूर मार्गे भीमा कोरेगावकडे जावे.
तर मुंबई, नवी मुंबई व ठाण्याकडून येणाऱ्या छोट्या चारचाकी वाहनांनी वडगाव फाटा, सेंट्रल चौक, भक्ती शक्ती चौक, नाशिक फाटा, खडकी, दापोडी तसेच बोपखेल मार्गे पुणे शहरात प्रवेश करून येरवडा, वाघोली, लोणीकंद मार्गे पुढे जावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.
नाशिककडून येणाऱ्या अनुयायांनी खेड–पाबळ–शिक्रापूर मार्गाचा अवलंब करावा.
दरम्यान, आळंदी येथील चऱ्होली बुद्रुक ते चऱ्होली खुर्द यांना जोडणारा पूल सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे आळंदी येथील प्रदक्षिणा मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे.
यामुळे आळंदी, मरकळ, तुळापूर, लोणीकंद मार्गे भीमा कोरेगावकडे जाणारे मार्ग अनुयायांनी तसेच सर्व प्रकारच्या खाजगी वाहनांनी वापरू नयेत, असे स्पष्ट निर्देश वाहतूक विभागाने दिले आहेत. नागरिकांनी पोलिसांच्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.