
या बैठकीस मा. अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष) श्री. ओमप्रकाश दिवटे, मा. उपायुक्त (निवडणूक) श्री. प्रसाद काटकर यांच्यासह विविध विभागांचे नोडल अधिकारी उपस्थित होते. निवडणूक कामकाज प्रभावीपणे पार पाडण्यासाठी एकूण २४ विषयांसाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, प्रत्येक नोडल अधिकाऱ्यांनी त्यांच्या विभागाशी संबंधित कामकाजाचे सादरीकरण केले.
मनुष्यबळ व्यवस्थापन कक्षाने मतदान केंद्रांसाठी २४ हजारांहून अधिक कर्मचारी उपलब्ध असून त्यांचे प्रशिक्षण सुरू असल्याची माहिती दिली. आचारसंहिता कक्षाने राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार SST, FST, VVT, VST पथके २४ तास कार्यरत असल्याचे सांगितले. आचारसंहिता भंगप्रकरणी १ एफआयआर दाखल करण्यात आली असून ८ हजारांहून अधिक फ्लेक्स, बॅनर व झेंडे हटविण्यात आले आहेत.
ईव्हीएम व्यवस्थापन अंतर्गत निवडणुकीसाठी ९ हजार ईव्हीएम उपलब्ध झाल्या असून उर्वरित मशीन आयोगाच्या निर्देशानुसार प्राप्त केल्या जात आहेत. सर्व ईव्हीएम वाहतूक वाहनांवर जीपीएस यंत्रणा बसविण्यात आली असून पोलीस बंदोबस्तात वाहतूक सुरू आहे. स्ट्रॉंगरूम अद्ययावत करून सीसीटीव्ही कार्यान्वित करण्यात आले आहेत.मतदान साहित्य छपाईबाबत ४,०११ मतदान केंद्रांसाठी ६,५०० साहित्य किट तयार करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून मतपत्रिका छपाईसाठी सर्व तयारी पूर्ण झाल्याचे सांगण्यात आले. वाहतूक व्यवस्थापनासाठी १,०५१ वाहने उपलब्ध करून देण्यात आली असून वाहतूक आराखडा नकाशासह अंतिम करण्यात येत आहे.
टपाली मतपत्रिकांसाठी ३० हजारांहून अधिक मागणी प्राप्त झाली असून त्यानुसार कार्यवाही सुरू आहे. माध्यम प्रमाणन व संनियंत्रण समितीमार्फत इलेक्ट्रॉनिक जाहिरात पूर्वप्रमाणन व पेड न्यूज प्रकरणी आतापर्यंत ९ अर्जांना मान्यता देण्यात आली आहे.
मतमोजणी केंद्र व्यवस्थापन अंतर्गत मतमोजणी केंद्रे निश्चित करण्यात आली असून टेबल संख्या, फेरीसंख्या व कर्मचारी नियुक्तीची तयारी सुरू आहे. ‘एक खिडकी कक्ष’ प्रणालीद्वारे प्रचारासाठी आवश्यक सर्व परवानग्या ऑनलाइन पद्धतीने देण्यात येणार असल्याने उमेदवारांनी याच प्रणालीचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले.तसेच सर्व मतदान केंद्रांवर किमान आवश्यक सुविधा (Assured Minimum Facilities), वैद्यकीय सुविधा तसेच दिव्यांग मतदारांसाठी व्हीलचेअर उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
निवडणूक खर्च व्यवस्थापन कक्षाने सर्व उमेदवारांनी दररोज दैनंदिन खर्चाचा तपशील विहित नमुन्यात सादर करण्याचे निर्देश दिले. यासोबतच खर्चासाठी बाबनिहाय दरसूची प्रसिद्ध करण्यात आल्याचे सांगण्यात आले. मा. आयुक्त श्री. नवल किशोर राम यांनी सर्व उमेदवारांनी निवडणूक खर्च अचूक व पारदर्शक पद्धतीने सादर करण्याचे आवाहन केले.
निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, प्रभावी व नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी सर्व नोडल अधिकाऱ्यांनी दक्षता घेण्याचे निर्देश देत सदर बैठक संपन्न झाली.