प्रभाग २५ मधून भाजपचे राघवेंद्र बाप्पु मानकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल

पुणे दि. 30 :पुणे शहराच्या मध्यवस्तीतील महत्त्वाचा भाग असलेल्या प्रभाग क्रमांक २५ (शनिवार पेठ–महात्मा फुले मंडई) मधून भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार राघवेंद्र बाप्पु मानकर यांनी मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने यांच्या उपस्थितीत, तसेच भाजपच्या अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या साक्षीने, बाप्पु मानकर यांच्यासह स्वरदा बापट, कुणाल टिळक आणि स्वप्नाली पंडित यांनी विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयात उमेदवारी अर्ज सादर केला.

यावेळी माजी नगरसेवक दिलीप काळोखे, माजी नगरसेविका गायत्री खडके, भाजपा कसबा विधानसभा अध्यक्ष अमित कंक, प्रभाग २५ चे भाजपा अध्यक्ष सुनील रसाळ यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

गेल्या दहा वर्षांपासून पक्ष संघटनेतील विविध जबाबदाऱ्या सांभाळत प्रभाग क्रमांक २५ मधील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी सातत्याने काम केल्यामुळे पक्षाने आपल्यावर विश्वास दाखवला असून, मिळालेल्या या संधीचे सोने करीन, असा विश्वास बाप्पु मानकर यांनी व्यक्त केला.

पुणे महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक २५ (शनिवार पेठ–महात्मा फुले मंडई) मधील ‘ब’ गटातून बाप्पु मानकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यांच्या सोबतच या प्रभागातून स्वरदा बापट, कुणाल टिळक व स्वप्नाली पंडित यांनाही भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे.

गेल्या नऊ वर्षांत पक्षाच्या विविध पदांवर कार्यरत राहून पुण्यातील पहिल्या २४ तास जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांच्या असंख्य तक्रारींचे निवारण केल्यामुळे बाप्पु मानकर हे प्रभागात परिचित नाव ठरले आहेत. तसेच गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये असलेला त्यांचा दांडगा जनसंपर्कही या उमेदवारीसाठी महत्त्वाचा ठरल्याचे बोलले जात आहे.

देश, राज्य आणि पुणे शहरात भारतीय जनता पक्षाने केलेल्या सर्वांगीण विकासाच्या कामांवर नागरिकांचा ठाम विश्वास असून, प्रभाग क्रमांक २५ मधील जनता भाजपच्या सर्व उमेदवारांना बहुमताने विजयी करेल, असा विश्वासही बाप्पु मानकर यांनी यावेळी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button