
पुणे : पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) यांची युती झाली असून, या युतीअंतर्गत आरपीआय (आठवले) पक्षाच्या वाट्याला ९ जागा मिळाल्या आहेत. ही माहिती आरपीआयचे शहराध्यक्ष संजय सोनवणे आणि प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
या अंतर्गत प्रभाग क्रमांक १ मधून राहुल भंडारे, प्रभाग २ अ मधून रेणुका चलवादी, प्रभाग २ ब मधून सुधीर वाघमारे, प्रभाग ६ मधून संतोष आरडे, प्रभाग ७ मधून निशा मानवदकर, प्रभाग ८ मधून परशुराम वाडेकर, प्रभाग १३ मधून निलेश आल्हाट, प्रभाग १४ मधून हिमाली कांबळे आणि प्रभाग २२ मधून बापू कांबळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
प्रसिद्धीपत्रकात पुढे नमूद करण्यात आले आहे की, आरपीआयकडून भाजपकडे सुरुवातीला १५ जागांची मागणी करण्यात आली होती. मात्र युतीतील वाटाघाटींनंतर भाजपने आरपीआयला ९ जागा दिल्या आहेत. या उमेदवार यादीत ६ पुरुष व ३ महिलांचा समावेश असून सामाजिक संतुलन राखण्यात आले आहे. उमेदवारांमध्ये ५ बौद्ध, ३ मातंग आणि १ धनगर समाजातील उमेदवारांचा समावेश आहे.
भाजप-आरपीआय युती म्हणून पुणे महापालिका निवडणूक लढवली जाणार असून, पुणे महापालिकेवर भाजप-आरपीआयची सत्ता येईल, असा विश्वास शहराध्यक्ष संजय सोनवणे, प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, शहर प्रभारी शैलेंद्र चव्हाण, परशुराम वाडेकर, महिपाल वाघमारे, शाम सदाफुले, मोहन जगताप आणि महिला अध्यक्ष हिमाली कांबळे यांच्यासह पक्ष पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.