PMC निवडणूक 2025: कुख्यात गुंड गजा मारणेच्या पत्नी जयश्री मारणे यांना अजित पवार गटाकडून उमेदवारी; पुण्याच्या राजकारणात खळबळ

पुणे, दि. ३० :  पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी (PMC Elections 2025) राजकीय वातावरण चांगलेच तापले असून कुख्यात गुंड गजा मारणे यांची पत्नी जयश्री मारणे यांना राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाकडून अधिकृत उमेदवारी देण्यात आल्याने मोठी चर्चा सुरू झाली आहे. आज, मंगळवार (३० डिसेंबर २०२५) हा उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने पुण्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे.

जयश्री मारणे या प्रभाग क्रमांक १० (बावधन) येथून निवडणूक लढवत असून त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचा अधिकृत ‘एबी’ (AB) फॉर्म देण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीवर आता अधिकृत शिक्कामोर्तब झाले आहे.

जयश्री मारणे या माजी नगरसेविका असून यापूर्वी त्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून (मनसे) निवडून आल्या होत्या. स्थानिक राजकारणातील त्यांचा अनुभव आणि प्रभागातील ओळख लक्षात घेता ही उमेदवारी महत्त्वाची मानली जात आहे.

मात्र, अजित पवार यांनी पुण्यातील गुन्हेगारी प्रवृत्ती मोडून काढण्याचे जाहीरपणे आवाहन केले असताना, एका कुख्यात गुंडाच्या पत्नीला उमेदवारी दिल्याने राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. विरोधकांकडून राष्ट्रवादी काँग्रेसवर टीकेची झोड उठवली जात असून, ‘गुन्हेगारीविरोधातील भूमिकेला हा छेद आहे का?’ असा सवाल उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, जयश्री मारणे यांच्या उमेदवारीमुळे प्रभाग क्रमांक १० मधील निवडणूक लढत अधिक रंगतदार होणार असून येत्या काही दिवसांत या मुद्द्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपांना अधिक धार येण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button