
पुणे, दि. ३० : ‘अभंग’ या काव्यप्रकाराच्या माध्यमातून समाजाला प्रबोधन करण्याची समृद्ध परंपरा महाराष्ट्राला लाभली आहे. या परंपरेला आधुनिक काळात नव्या आशयाने पुढे नेण्याचे कार्य सुप्रसिद्ध कवी, वक्ते व गप्पाष्टककार डॉ. संजय उपाध्ये यांनी ‘विवेक संहिता’ या आधुनिक अभंगसंग्रहाच्या माध्यमातून केले आहे. आजच्या काळात माणसाने कसे जगावे, जीवनाकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहावे, याचे मार्गदर्शन या संग्रहातून करण्यात आले आहे, असे प्रतिपादन एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे संस्थापक-अध्यक्ष, विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी केले.
डॉ. संजय उपाध्ये लिखित ‘विवेक संहिता’ या आधुनिक अभंगसंग्रहाचे प्रकाशन एमआयटी विश्वशांती विद्यापीठात विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. या संग्रहात एकूण १०१ अभंगरचना असून, विवेकबुद्धीला आवाहन करत समाजाला विवेकाच्या मार्गाने जगण्याचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
यावेळी डॉ. सुचित्रा कराड-नागरे, कुलगुरू डॉ. रविकुमार चिटणीस, शास्त्रज्ञ अशोक जोशी, डॉ. दीपक रानडे, गिरीश दाते आणि डॉ. महेश थोरवे उपस्थित होते.
प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,
“माझ्यासोबत काम करताना एखाद्या विषयावर कविता, गीत किंवा आरतीची आवश्यकता असेल तर डॉ. संजय उपाध्ये ते त्वरित साकारतात. इंद्रायणीची आरती, चंद्रभागेची आरती, वाखरीचे गीत ही त्याची उत्तम उदाहरणे आहेत. त्यांच्या लेखनातून प्रगल्भता आणि सामाजिक भान स्पष्टपणे दिसून येते.”
दरम्यान, चिंचवड येथील काशीधाम मंगल कार्यालयात झालेल्या ‘मी नि कविता’ या कार्यक्रमादरम्यान सुहास पोफळे, राजाभाऊ गोलांडे, अवधूत कुलकर्णी, विवेक कुंभोजकर आणि नितीन जोशी यांनी सपत्नीक ‘विवेक संहिता’ अभंगसंग्रहाचे प्रकाशन केले.
या प्रसंगी बोलताना डॉ. संजय उपाध्ये म्हणाले,
“अत्यंत सोप्या आणि सरळ भाषेत वाचकांच्या जीवनातील संभ्रम, अडचणी, निराशा यावर मात करण्याचे मार्ग या अभंगांमधून सूचित केले आहेत. वाचक निश्चितच या संग्रहातून बोध घेतील आणि स्वतःचा तसेच समाजाचा जीवनमार्ग अधिक उजळून काढतील.”
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुहास पोफळे यांनी केले.