
नवी दिल्ली दि. 30 :काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी आणि उद्योजक रॉबर्ट वाड्रा यांचे पुत्र रेहान वाड्रा यांचा साखरपुडा त्यांच्या दीर्घकाळच्या मैत्रीण अवीवा बेग (Aviva Baig) हिच्याशी पार पडला आहे. हा साखरपुडा ३० डिसेंबर २०२५ रोजी राजस्थानमधील रणथंबोर येथे अत्यंत खासगी स्वरूपात संपन्न झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, रेहान वाड्रा आणि अवीवा बेग हे गेल्या सात वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. अवीवा या दिल्लीतील एका प्रतिष्ठित व्यावसायिक कुटुंबातील असून, दोन्ही कुटुंबीयांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. समारंभाला केवळ जवळचे नातेवाईक आणि कुटुंबीय उपस्थित होते.
साखरपुडा झाल्याने गांधी–वाड्रा कुटुंबात लवकरच लग्नाची धामधूम पाहायला मिळण्याची शक्यता आहे. लग्नाची तारीख अद्याप जाहीर झालेली नसली तरी ती लवकरच घोषित केली जाईल, असे समजते.
दरम्यान, रेहान वाड्रा हे एक व्हिज्युअल आर्टिस्ट असून त्यांनी कला क्षेत्रात स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. या साखरपुड्याबाबत कुटुंबाकडून अधिकृत निवेदन प्रसिद्ध करण्यात आलेले नसले, तरी विविध विश्वासार्ह माध्यमांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.