
पुणे : दि. 30 : राज्यातील युवकांच्या कलागुणांना आणि सर्जनशीलतेला व्यासपीठ मिळावे यासाठी राज्यस्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन २९ डिसेंबर २०२५ ते १ जानेवारी २०२६ या कालावधीत ग. दि. माडगुळकर नाट्यगृह, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, निगडी येथे करण्यात आले आहे. या महोत्सवात अधिकाधिक युवक-युवतींनी उत्स्फूर्त सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी केले आहे.
युवकांचा सर्वांगीण विकास साधणे, भारतीय संस्कृती व परंपरेचे जतन करणे, युवकांमधील सुप्त गुणांना वाव देणे तसेच राष्ट्रीय एकात्मता बळकट करणे या उद्देशाने दरवर्षी जिल्हा, विभाग आणि राज्यस्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. सन २०२५–२६ च्या राज्यस्तरीय युवा महोत्सवाचे यजमानपद यंदा जिल्ह्याला लाभले आहे.
या महोत्सवात पुणे, कोल्हापूर, लातूर, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, अमरावती, नाशिक आणि मुंबई या आठ विभागांमधून सुमारे ५०० युवक-युवती (वयोगट १५ ते २९ वर्षे) सहभागी होणार आहेत. लोकगीत, लोकनृत्य, कथालेखन, चित्रकला, वक्तृत्व, काव्यलेखन अशा विविध सांस्कृतिक व साहित्यिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धांमधील विजयी संघांना १० ते १२ जानेवारी २०२६ दरम्यान दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय युवा महोत्सवात महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे.
याशिवाय युवकांना त्यांचे अभिनव विज्ञान व तंत्रज्ञान प्रकल्प सादर करण्यासाठी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येणार आहे. विज्ञान व तंत्रज्ञानाविषयी जिज्ञासा निर्माण करणे, सामाजिक विकासासाठी विज्ञानाचा वापर करण्यास प्रोत्साहन देणे आणि नवसंशोधकांचा समुदाय घडवणे ही या प्रदर्शनाची प्रमुख उद्दिष्टे आहेत. विभागस्तरीय स्पर्धेत प्रथम व द्वितीय क्रमांक मिळविणाऱ्या पथकांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात येणार असून ही स्पर्धा केवळ राज्यस्तरापुरती मर्यादित राहणार असल्याचेही श्री. लकडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.