
पुणे दि. 30 : केंद्र व राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध आरोग्य योजनांमुळे ग्रामीण, निमशहरी व दुर्गम भागातील नागरिकांना दर्जेदार प्रतिबंधात्मक व रोगनिवारक आरोग्य सेवा उपलब्ध होत आहेत. या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करत इंदापूर येथील उपजिल्हा रुग्णालय ग्रामीण–निमशहरी जनतेसाठी खऱ्या अर्थाने वरदान ठरत आहे.
आरोग्य हीच खरी संपत्ती असून निरोगी समाजाच्या उभारणीसाठी शासनाकडून आरोग्यदायी योजना राबविणे हे कर्तव्य आहे. याच भूमिकेतून उपजिल्हा रुग्णालय इंदापूरने वर्षभरात तब्बल ७९ हजारांहून अधिक रुग्णांना आरोग्यसेवा पुरवून उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
७५ हजारांहून अधिक बाह्यरुग्णांना सेवा
सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत आरोग्य उपसंचालक डॉ. भगवान पवार व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागनाथ येमपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णालयात यंदा
७५,९७९ बाह्यरुग्ण सेवा
३,१०५ आंतररुग्ण सेवा
देण्यात आल्या आहेत.
अस्थिरोग, स्त्रीरोग व बालरोग विभागाची भरीव कामगिरी
अस्थिरोग विभागात हाडांचे फ्रॅक्चर, प्लेट–स्क्रू बसवणे, सांधेरोपण अशा ४२ शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडल्या.
स्त्रीरोग विभागात
३८२ प्रसूती (नॉर्मल व सिझरियन)
गरोदर मातांची तपासणी, सोनोग्राफी (१,४६०),
गर्भाशयमुख व स्तन कर्करोग तपासणी, बायोप्सी,
मूलबंद शस्त्रक्रिया व गर्भपात सेवा
पुरविण्यात आल्या.
बालरोग विभागात सर्व लसीकरण, नवजात बाळांवरील उपचार, फोटोथेरपीसह अपेंडिक्स, हर्निया, हायड्रोसिल आदी ३१ शस्त्रक्रिया करण्यात आल्या.
२४ तास अत्यावश्यक व निदान सेवा
अतिदक्षता विभागात सर्पदंश, विषप्राशन, लकवा, मधुमेह, उच्च रक्तदाब यावर उपचार केले जातात.
क्रसना डायग्नोस्टिकअंतर्गत
८,८२० मोफत सीटी स्कॅन
७,५७७ एक्स-रे
२४ तास उपलब्ध आहेत.
आपत्कालीन सेवा व इतर सुविधा
१०८ व १०२ रुग्णवाहिका सेवा
२४ तास पोस्टमार्टम सुविधा (९३ शवविच्छेदन)
जन्म–मृत्यू व विवाह नोंदणी
दिव्यांग प्रमाणपत्र तपासणी
महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत डायलेसिस सेवा
मध्यवर्ती ऑक्सिजन लाईन, मॉड्युलर ओटी, लेबर रूम, शवागार, गरम पाणी व पिण्याच्या पाण्याची सोय
जनतेचा विश्वास दृढ
याबाबत वैद्यकीय अधीक्षक डॉ. सिद्धार्थ नामपल्ले म्हणाले,
“ग्रामीण व निमशहरी भागातील गोरगरीब नागरिकांसाठी उपजिल्हा रुग्णालय इंदापूर हे वरदान ठरत असून, दर्जेदार आरोग्यसेवेमुळे सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील नागरिकांचा विश्वास अधिक बळकट होत आहे.”