पुणेचे सत्यशोधक रघुनाथ ढोक ‘भारतीय संविधान सन्मान – राष्ट्रीय गौरव पुरस्कार 2025’ ने सन्मानित

चंद्रपूर/भद्रावती – पुणे येथील फुले शाहू आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष तसेच महात्मा फुले चरित्र साधने साहित्य व प्रकाशन समिती, महाराष्ट्र शासनाचे सदस्य, सत्यशोधक रघुनाथ ढोक यांना साहित्य व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी ‘भारतीय संविधान सन्मान – राष्ट्रीय गौरव पुरस्कार 2025’ प्रदान करून गौरविण्यात आले.

रविवार, दिनांक 28 डिसेंबर 2025 रोजी भद्रावती (जि. चंद्रपूर) येथील तथागत बुद्धविहार, नवीन सुमठाणा येथे भारतीय संविधान दिन व डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित विशेष समारंभात दुपारी 2 वाजता मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मानपत्र, मोमेंटो, शाल व श्रीफळ देऊन हा गौरव करण्यात आला.

या सोहळ्याचे आयोजन भारतीय संविधान सन्मान समारोह समिती, मौलिक अधिकार संघर्ष समिती व ह्युमन राईट्स असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. प्रविण चिमुरकर होते. स्वागताध्यक्ष म्हणून मा. मनोजभाऊ मोडक, तर मार्गदर्शक म्हणून जेष्ठ साहित्यिक मधुकररावजी बावलकर (तेलंगणा), रविंद्र चिवडे व ब्रीजभूषण पाझारे उपस्थित होते.

याप्रसंगी अॅड. पूनम वाघमारे यांनी सोप्या व अभ्यासपूर्ण भाषेत भारतीय संविधानाचे महत्त्व विशद केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान निर्मितीत केलेले अमूल्य योगदान आणि महिलांसाठी दिलेले हक्क यावर त्यांनी सखोल मार्गदर्शन केले.

सत्कारास उत्तर देताना सत्यशोधक रघुनाथ ढोक म्हणाले की, गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्र व तेलंगणा राज्यात पूर्णपणे मोफत 54 सत्यशोधक विवाह आणि 15 वास्तू/गृहप्रवेश विधी पार पाडले आहेत. तसेच सामाजिक, शैक्षणिक व सहकार क्षेत्रात सक्रिय राहून ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले’, ‘महात्मा फुले गीतचरित्र’ यांसारखी महत्त्वपूर्ण पुस्तके विविध भाषांमध्ये प्रकाशित केली आहेत.

विवाहप्रसंगी वधू-वरांना फुले दांपत्याचा फोटो फ्रेम व भारतीय संविधानाची प्रत भेट देण्याचा उपक्रम सातत्याने राबवत असून, नुकत्याच अमृत महोत्सवी संविधान दिनानिमित्त सांगली येथे उच्चशिक्षित वधू-वरांचा विवाह लावून 75 संविधान प्रती व संत रोहिदास ग्रंथांचे वाटप करण्यात आले. या सर्व सामाजिक कार्याची दखल घेऊनच हा पुरस्कार मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. समाजकार्याची ही ज्योत अखंड पेटती ठेवण्यासाठी सर्वांचे आशीर्वाद लाभावेत, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button