आयुक्त नवल किशोर राम यांची निवडणूक कार्यालयाला अचानक भेट; NOC वेळेत व पारदर्शक देण्याच्या स्पष्ट सूचना

पुणे दि. 30 : पुणे महानगरपालिकेचे आयुक्त मा. श्री. नवल किशोर राम यांनी आज सोमवार, दि. २९ डिसेंबर २०२५ रोजी शिवाजीनगर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर भवनमध्ये स्थापन करण्यात आलेल्या निवडणूक कार्यालयातील सभागृहाचे उद्घाटन केले. यानंतर त्यांनी निवडणूक कार्यालयांतर्गत कार्यरत असलेल्या ना हरकत कक्षाला (NOC Cell) अचानक भेट देत प्रत्यक्ष कामकाजाची पाहणी केली.या भेटीदरम्यान आयुक्त राम यांनी कक्षातील कार्यपद्धती, अर्जांची प्रक्रिया, कालमर्यादा व नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवा यांची सविस्तर माहिती घेतली. निवडणूक प्रक्रियेदरम्यान उमेदवार व नागरिकांना कोणत्याही प्रकारचा विलंब अथवा तक्रारींचा सामना करावा लागू नये, यासाठी सर्व आवश्यक ना हरकत प्रमाणपत्रे वेळेत, पारदर्शक व कार्यक्षम पद्धतीने उपलब्ध करून देण्याच्या स्पष्ट सूचना त्यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना दिल्या.सर्व अर्जांची तातडीने पूर्तता करावी तसेच कोणताही अनावश्यक अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घेण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. यावेळी आयुक्त राम यांनी निवडणूक काळात अशाच प्रकारे विविध विभागांना अचानक भेटी देऊन कामकाजाचा प्रत्यक्ष आढावा घेण्यात येणार असल्याचेही स्पष्ट केले.निवडणूक प्रक्रिया सुलभ, निष्पक्ष, पारदर्शक आणि नागरिकाभिमुख राहावी यासाठी पुणे महापालिका प्रशासन पूर्णतः सज्ज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.या प्रसंगी अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष) मा. श्री. ओमप्रकाश दिवटे, उपायुक्त श्री. प्रसाद काटकर, श्री. रवी पवार, श्री. अरविंद माळी, श्री. तुषार बाबर, सहाय्यक आयुक्त श्री. सोमनाथ आढाव, श्री. कैलास केंद्रे, श्रीमती इंद्रायणी करचे तसेच निवडणूक कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button