
पुणे : संघटनात्मक काम, कार्यकर्त्यांशी असलेला जवळचा संपर्क आणि प्रभागातील नागरिकांशी सातत्यपूर्ण नातं या ‘मेरिट’च्या आधारे भारतीय जनता पक्षाने पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक २५ (शनिवार पेठ – महात्मा फुले मंडई) येथून भाजपचे शहर सरचिटणीस राघवेंद्र ऊर्फ बाप्पु मानकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
गेल्या सुमारे नऊ वर्षांपासून बाप्पु मानकर हे भाजप संघटनेत पूर्णवेळ कार्यकर्ता व पदाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. शहरपातळीवरील पक्षकार्य सांभाळताना त्यांनी प्रभागातील स्थानिक प्रश्नांकडेही सातत्याने लक्ष दिले. भाजयुमोच्या माध्यमातून शहरभर युवकांची मजबूत फळी उभारण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात भाजप विरोधी पक्षात असताना, भाजयुमोच्या नेतृत्वाखाली त्यांनी अनेक आंदोलनांद्वारे सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. कोरोना काळात रेमडीसीव्हीर इंजेक्शनसाठीचे आंदोलन, शालेय फी माफीसाठीचे आंदोलन तसेच विद्यापीठ कायदाविरोधी आंदोलन यामुळे त्यांचे नेतृत्व चर्चेत आले होते.
भाजयुमोतील प्रभावी संघटनात्मक कामाची दखल घेत पुढे पक्षाने त्यांच्यावर पुणे शहर सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपवली. शहर कार्यकारिणीत कार्यरत असताना विविध पक्ष कार्यक्रमांचे नियोजन, कार्यकर्त्यांचा समन्वय आणि शहरपातळीवरील उपक्रमांमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. लोकसभा निवडणुकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रेसकोर्स मैदानावरील सभेच्या नियोजनातही त्यांचा सक्रिय सहभाग होता.
२४ तास सुरू असलेले जनसंपर्क कार्यालय
२०१६ साली बाप्पु मानकर यांनी प्रभागात २४ तास सुरू असलेले जनसंपर्क कार्यालय सुरू केले. ज्येष्ठ नागरिकांसह सर्वसामान्यांना कोणत्याही वेळी मदतीसाठी उपलब्ध राहावे, या उद्देशाने हे कार्यालय सुरू करण्यात आले. या माध्यमातून आतापर्यंत सुमारे सहा हजारांहून अधिक नागरिकांची कामे मार्गी लागल्याची चर्चा प्रभागात आहे.
शहरभर युवकांचे संघटन आणि प्रभागातील नागरिकांशी असलेला मजबूत जनसंपर्क या दोन्ही आघाड्यांवर प्रभावी काम केल्यामुळे भाजपने बाप्पु मानकर यांना उमेदवारी दिल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.