
पुणे, दि. २९ : पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपण्यास अवघा एक दिवस शिल्लक असताना अद्यापही प्रमुख राजकीय पक्षांकडून अधिकृत उमेदवार यादी जाहीर झालेली नाही. मात्र, उमेदवारी निश्चित झालेल्या काही उमेदवारांना थेट पक्षाकडून एबी फॉर्म देण्यात आले असून त्यामधूनच भाजपाकडून पुणे शहरातील पहिला उमेदवारी अर्ज आज दाखल करण्यात आला.
भारतीय जनता पक्षाचे माजी सभागृह नेते आणि निवडणूक प्रमुख गणेश बिडकर यांनी प्रभाग क्रमांक २४ मधून भाजपाकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात सोमवारी सकाळी हा अर्ज दाखल करण्यात आला. यावेळी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, आमदार हेमंत रासने यांची प्रमुख उपस्थिती होती.
अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमांशी बोलताना गणेश बिडकर यांनी महायुतीच्या विजयाचा ठाम विश्वास व्यक्त केला. पुणे महानगरपालिका निवडणुकीत महायुतीचे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पुणे शहरात भाजपाची अधिकृत उमेदवारी मिळवून उमेदवारी अर्ज दाखल करणारे गणेश बिडकर हे पहिले उमेदवार ठरले आहेत. त्यांच्यासोबत प्रभाग क्रमांक २४ मधील इतर तिन्ही उमेदवारांनी देखील आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
यावेळी गणेश बिडकर म्हणाले,
“लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पुणेकरांनी भाजपाला भरभरून पाठिंबा दिला. त्यामुळे महापालिका निवडणुकीतही पुणेकर महायुतीच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील. पुणे हे जगातील महत्त्वाचे शहर म्हणून जागतिक नकाशावर आणण्याचा आमचा संकल्प आहे. गेल्या कार्यकाळात अनेक मोठे विकास प्रकल्प पूर्ण केले असून येत्या कार्यकाळात पुण्याचा विकास अधिक वेगाने पुढे नेण्याचा आमचा प्रयत्न राहील.”