
पुणे, दि. 29 : समाजाचे शारीरिक आरोग्य जपण्याचे काम डॉक्टर करतात, तर देशाच्या आर्थिक आरोग्याची जबाबदारी सनदी लेखापालांवर असते. त्यामुळे चार्टर्ड अकाउंटंट हे अर्थव्यवस्थेचे डॉक्टर असून, ही भूमिका पार पाडताना नैतिकता, कौशल्यविकास आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार अत्यंत आवश्यक आहे, असे प्रतिपादन सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या प्रधान संचालिका डॉ. विद्या येरवडेकर यांनी केले.
दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI), नवी दिल्ली आणि ICAI पुणे शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने बाणेर येथील बंटारा भवन येथे आयोजित दीक्षांत समारंभात त्या बोलत होत्या. यावेळी १४०० विद्यार्थ्यांना चार्टर्ड अकाउंटंट पदवी व सभासदत्व प्रदान करण्यात आले.
डॉ. येरवडेकर म्हणाल्या की, आजचा सीए केवळ लेखापरीक्षणापुरता मर्यादित राहिलेला नसून, तो राष्ट्रनिर्मितीतील महत्त्वाचा धोरणात्मक भागीदार बनला आहे. जागतिक पातळीवर स्पर्धात्मक राहण्यासाठी आर्थिक ज्ञानासोबतच कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), डेटा अॅनालिटिक्स आणि डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करणे आवश्यक आहे.
समारंभास ICAI केंद्रीय समिती सदस्य व मुख्य समन्वयक सीए चंद्रशेखर चितळे, समन्वयक सीए उमेश शर्मा, विभागीय समिती सदस्य सीए अभिषेक धामणे, पुणे शाखेचे अध्यक्ष सीए सचिन मिणियार, उपाध्यक्ष सीए प्रणव आपटे, सचिव सीए निलेश येवलेकर, खजिनदार सीए नेहा फडके, कार्यकारिणी सदस्य सीए हृषिकेश बडवे आदी मान्यवर उपस्थित होते.
सीए चंद्रशेखर चितळे यांनी सांगितले की, भारतीय सीएंसाठी जागतिक स्तरावर मोठ्या संधी उपलब्ध असून ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर्स (GCC) मध्ये भारतीय सीएंची मागणी वाढत आहे. देश पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करत असताना तरुण सीएंनी प्रामाणिकपणा आणि व्यावसायिक नैतिकतेचा आदर्श ठेवावा, असेही त्यांनी नमूद केले.
फॉरेन्सिक ऑडिट, जीएसटी, डेटा अॅनालिटिक्स यांसारख्या नव्या क्षेत्रांत सातत्याने कौशल्यवृद्धी करण्याचे आवाहन सीए उमेश शर्मा यांनी केले. तर प्रास्ताविकात सीए सचिन मिणियार यांनी ICAI तर्फे सभासदांच्या व्यावसायिक व वैयक्तिक विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
समारंभात गुणवत्ताधारक व क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. सीए पदवीधरांनी व्यावसायिक आचारसंहितेचे पालन करण्याची शपथ घेतली. सीए प्रणव मंत्री यांनी सूत्रसंचालन केले, तर सीए अभिषेक धामणे यांनी आभार मानले.