मुखवट्यामागील गडद रहस्य उलगडणारा ‘केस नं. ७३’ : चार खून, शून्य पुरावे आणि असंख्य प्रश्न

पुणे दि. 29 :  प्रत्येक माणूस एक मुखवटा घालून जगतो… त्या मुखवट्यामागे दडलेले असतात असंख्य भावना, वेदना आणि रहस्य. हाच गूढ विचार केंद्रस्थानी ठेवत मराठी चित्रपटसृष्टीत एक चक्रावून टाकणारा रहस्यपट येत आहे – ‘केस नं. ७३’. ना चेहरा, ना निमित्त, चार खून, शून्य पुरावे… अशा थरारक टॅगलाईनसह या चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रेक्षकांच्या मनात अनेक प्रश्न उभे करत आहे.

लायलॅक मोशन पिक्चर्स आणि डस्क स्टुडिओज निर्मित ‘केस नं. ७३’ हा मराठी चित्रपट नवीन वर्षाच्या सुरुवातीला, जानेवारी महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन डॉ. मिलिंद मुक्तेश्वर आपटे यांनी केले असून निर्मितीची जबाबदारी शर्वरी सतीश वटक आणि डॉ. मिलिंद मुक्तेश्वर आपटे यांनी सांभाळली आहे. सहनिर्माते म्हणून प्रविण अरुण खंगार सहभागी आहेत.

चित्रपटात अशोक शिंदे, राजसी भावे, शैलेश दातार, नंदिता पाटकर आणि पियुष आपटे यांची दमदार स्टारकास्ट दिसणार आहे. प्रत्येक प्रसंगातून एक नवे गूढ उलगडत जाते आणि प्रत्येक उत्तरामागे आणखी खोल प्रश्न उभे राहतात, ही या चित्रपटाची खासियत आहे.

दिग्दर्शक डॉ. मिलिंद मुक्तेश्वर आपटे म्हणतात, “हा केवळ रहस्यमय चित्रपट नाही, तर प्रेक्षकांच्या विचारांना आव्हान देणारी कथा आहे. प्रत्येक प्रेक्षक या कथेत स्वतःचं वेगळं सत्य शोधेल.” तर निर्माते शर्वरी सतीश वटक आणि डॉ. मिलिंद मुक्तेश्वर आपटे यांचा विश्वास आहे की, “मराठी चित्रपटसृष्टीतील रहस्यपटांचा दर्जा अधिक उंचावण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि ‘केस नं. ७३’ प्रेक्षकांना वेगळाच सिनेमॅटिक अनुभव देईल.”

चित्रपटाची पटकथा डॉ. ऋचा अमित येनुरकर यांनी लिहिली असून गीतलेखन मंदार चोळकर यांचे आहे. संगीत व पार्शवसंगीताची जबाबदारी अमेय मोहन कडू यांनी सांभाळली आहे. छायांकन निनाद गोसावी यांचे आहे.

रहस्य, थरार आणि अनपेक्षित वळणांनी भरलेला ‘केस नं. ७३’ नेमका कोणाच्या चेहऱ्यावरचा मुखवटा काढणार, हे पाहणे प्रेक्षकांसाठी निश्चितच रंजक ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button