
पुणे दि. 29 : लावणी म्हणजे महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख आणि तिची मोहिनी आजही रसिकांच्या मनावर राज्य करते. नखरेल अदाकारी, ठसकेबाज ठेका आणि भावपूर्ण अभिनय यांचा संगम असलेली लावणी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर धुमाकूळ घालणार आहे. लोकप्रिय लावणी नृत्यांगना हिंदवी पाटील आणि प्रसिद्ध अभिनेत्री-नृत्यांगना सुरेखा कुडची या पहिल्यांदाच एकत्र येत असून, आगामी मराठी चित्रपट ‘जब्राट’मध्ये त्या लावणीचा फड गाजवताना दिसणार आहेत.
तारा करमणूक निर्मित आणि प्रगती कोळगे दिग्दर्शित ‘जब्राट’ हा चित्रपट येत्या ६ फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातील बहारदार लावणीची झलक नुकतीच प्रदर्शित झाली असून, त्याला रसिकांकडून चांगलीच दाद मिळत आहे.
हिंदवी पाटील आणि सुरेखा कुडची यांच्या ठसकेबाज अदाकारीची जुगलबंदी या लावणीत पाहायला मिळते. “ही लावणी सादर करताना आम्ही मनापासून आनंद घेतला. तोच आनंद प्रेक्षकांनाही नक्कीच मिळेल,” असा विश्वास या दोघींनी व्यक्त केला आहे.
किती सावरू पुन्हा पुन्हा
कशा झाकू या खाणाखुणा
नाही बिचाऱ्या पदराचा या गुन्हा
हे शब्द डॉ. जयभीम शिंदे यांनी लिहिले असून, त्यांना बेला शेंडे यांच्या सुमधुर स्वरांची साथ लाभली आहे. संगीतकार म्हणूनही डॉ. जयभीम शिंदे यांनी या लावणीला ठेका धरायला लावला आहे. या बहारदार लावणीचे नृत्यदिग्दर्शन आशिष पाटील यांनी केले आहे.
‘जब्राट’ चित्रपटाचे निर्माते अनिल अरोड़ा, गोविंद मोदी आणि प्रगती कोळगे आहेत. छायांकनाची जबाबदारी अनिकेत खंडागळे यांनी सांभाळली असून, सहाय्यक असोसिएट म्हणून चार्लेस गोम्स कार्यरत आहेत. वेशभूषेची जबाबदारी युगेशा ओमकार यांनी सांभाळली आहे. बेला शेंडे, आर्या आंबेकर, वैशाली माडे, नंदेश उमप, डॉ. जयभीम शिंदे, अनुराग जगदाळे, स्वराज्य भोसले, राजनंदिनी मगर आणि स्वाती शिंदे यांच्या स्वरांनी या चित्रपटातील गाणी सजली आहेत.