
पुणे : अनाथांची माय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘पद्मश्री’ डॉ. सौ. सिंधुताई सपकाळ (माई) यांच्या कार्याचा वारसा पुढे नेणाऱ्या ‘माई परिवार’तर्फे त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त दरवर्षी प्रदान करण्यात येणारा ‘पद्मश्री डॉ. सौ. सिंधुताई सपकाळ यशोदा माई राष्ट्रीय पुरस्कार’ यंदा सामाजिक क्षेत्रात निस्पृहपणे कार्य करणाऱ्या मा. रेणुताई गावस्कर (अध्यक्षा – एकलव्य बाल शिक्षण व आरोग्य न्यास, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग) आणि सेवा संकल्प प्रतिष्ठान (चिखली, जि. बुलढाणा) यांना जाहीर करण्यात आला आहे.
या पुरस्काराचे हे चौथे वर्ष असून, समाजसेवेतील उल्लेखनीय योगदानाची दखल म्हणून हा मानाचा सन्मान दिला जातो, अशी माहिती ममता सिंधुताई सपकाळ यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
पुरस्कार वितरण सोहळा रविवार, ४ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ५:३० वाजता पुणे येथील बालगंधर्व रंगमंदिर येथे होणार आहे. याच कार्यक्रमात माईंचा खडतर पण प्रेरणादायी जीवनप्रवास लहान मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ‘चिंधीची गोष्ट’ या विशेष बालकथासंग्रहाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात येणार आहे.
या सोहळ्याच्या अध्यक्षपदी पद्मश्री श्री. गिरीश प्रभुणे असतील. प्रमुख पाहुणे म्हणून भारत फोर्ज लिमिटेडचे उपाध्यक्ष व सहव्यवस्थापकीय संचालक मा. श्री. अमित कल्याणी उपस्थित राहणार असून, विलू पूनावाला फाउंडेशनचे सीईओ मा. श्री. जसविंदर नारंग यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्षिप्रा मानकर (अमरावती) या करणार आहेत.
माईंच्या विचारांवर श्रद्धा ठेवणाऱ्या आणि त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेणाऱ्या सर्व पुणेकरांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन माई परिवार यांच्यातर्फे करण्यात आले आहे.