
पुणे दि. 29 : मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आपली पहिली अधिकृत उमेदवार यादी सोमवारी, २९ डिसेंबर २०२५ रोजी जाहीर केली. या पहिल्या टप्प्यात एकूण ४५ उमेदवारांना AB फॉर्म देण्यात आले असून, पुढील काही दिवसांत उर्वरित उमेदवारांची यादी जाहीर होण्याची शक्यता आहे.
या यादीत माजी महापौर आणि पक्षातील महत्त्वाचे नेते सुनील प्रभू, तसेच खासदार विनायक राऊत यांचे चिरंजीव यांचा समावेश आहे. याशिवाय अजिंक्य धात्रक (वॉर्ड २२५), सचिन पडवळ (वॉर्ड २०७), सुवर्णा मोरे (वॉर्ड १६७), श्वेता पावस्कर (वॉर्ड ११७), सुधीर खातू (वॉर्ड १६८), रमाकांत पहाटे (वॉर्ड २०८) आणि गीता अहरेकर (वॉर्ड २१८) यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, ठाकरे गटाकडून सुमारे ९० इच्छुकांना उमेदवारीचे प्राथमिक संकेत देण्यात आले आहेत. मात्र, तिकीट न मिळाल्याने काही इच्छुकांनी ‘मातोश्री’बाहेर नाराजी व्यक्त करत निदर्शने केल्याचे चित्रही पाहायला मिळाले.
या निवडणुकीसाठी राजकीयदृष्ट्या महत्त्वाची घडामोड म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे (मनसे) यांची २० वर्षांनंतर झालेली युती. या युतीनुसार शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाला १४५ ते १५० जागा, तर मनसेला ६५ ते ७० जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार असून, १६ जानेवारी २०२६ रोजी निकाल जाहीर होणार आहे. उमेदवार यादी जाहीर होताच मुंबईतील राजकीय वातावरण तापले असून, पुढील काही दिवसांत प्रचाराला वेग येण्याची चिन्हे आहेत.