
पुणे दि. 29 : सरत्या वर्षाला निरोप देत नव्या वर्षाचे जल्लोषात स्वागत होत असताना 2025 हे वर्ष अनेक कलाकारांसाठी लक्षवेधी ठरले. नवनवीन प्रोजेक्ट्स, अनपेक्षित कोलॅबोरेशन्स आणि वेगळ्या प्रयोगांमुळे मनोरंजन विश्वात अनेक नावे चर्चेत राहिली. मात्र या सर्वांमध्ये संगीत विश्वात एक नाव विशेषत्वाने चर्चेत राहिले ते म्हणजे गायक अभिजीत सावंत.
संगीत विश्वात 20 वर्षांचा यशस्वी प्रवास पूर्ण करत अभिजीत सावंतने 2025 हे वर्ष नावीन्यपूर्ण आणि वैविध्यपूर्ण प्रोजेक्ट्सने खास बनवले. सदाबहार गाण्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अभिजीतने यंदा जुन्या आयकॉनिक गाण्यांना मॉडर्न ट्विस्ट देत जेन झी जनरेशनला OG गाण्यांचे नवे कोर व्हर्जन सादर केले, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
‘इंडियन आयडॉल’मधून सुरू झालेला अभिजीतचा प्रवास अनेक रिअॅलिटी शोजपर्यंत पोहोचला. 2025 मध्ये ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’मध्ये सहभाग घेत त्याने गाण्याबरोबरच स्वयंपाकातही आपली छाप पाडली आणि नामवंत शेफ्ससोबत प्रेक्षकांची मने जिंकली. गाणं आणि खाणं या दोन्ही गोष्टींचा समतोल साधत त्याने यंदा अनेक लोकप्रिय गाणी सादर केली.
बॉलिवूडमधील प्रतिष्ठित ‘बॉलिवूड म्युझिक प्रोजेक्ट’ या संगीत महोत्सवात अभिजीतने मराठी गाणे सादर करत हिंदी रसिक प्रेक्षकांनाही भुरळ घातली. अजय–अतुल या जोडी नंतर या मंचावर मराठी गाण्याचा मान मिळवणारा तो कलाकार ठरला.
याचबरोबर आयपॉपस्टारसारख्या मंचावर किंगसोबत ‘मोहब्बते लुटाऊंगा’ हे गाणे नव्या अंदाजात सादर करत अभिजीतने जेन झीपासून मिलेनियल्सपर्यंत सर्वांची मने जिंकली. हे गाणे सोशल मीडियावर ट्रेंडही झाले.
‘तुझी चाल तुरु तुरु’, ‘ढगाला लागली कळा’, ‘रुपेरी वाळूत’ यांसारख्या जुन्या सदाबहार गाण्यांना हटके ट्विस्ट देत अभिजीतच्या आवाजाने ही गाणी पुन्हा एकदा नव्या पिढीपर्यंत पोहोचवली. 2025 मध्ये रिक्रिएट केलेल्या या आयकॉनिक गाण्यांवर तरुणाई ट्रेंड करताना दिसली.
वर्षाच्या शेवटी आणखी एक मोठे आणि अनपेक्षित कोलॅबोरेशन करत अभिजीत सावंत नृत्यांगना गौतमी पाटीलसोबत ‘रुपेरी वाळूत’ या धमाकेदार गाण्याद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि पुन्हा एकदा चर्चेत राहिला. गाण्यातील त्याचा अभिनय आणि ट्रेंडी अंदाज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला.
नव्या वर्षात अभिजीत सावंत मराठीसोबतच हिंदी इंडस्ट्रीत कोणते नवे प्रयोग आणि गाणी सादर करणार, याकडे रसिकांचे लक्ष लागले आहे.