
पुणे, दि. 29 : भारतीय जनता पक्षाच्या डिजिटल प्रचार रथांचे उद्घाटन रविवारी सायंकाळी एरंडवणे येथील शहर कार्यालयासमोर मोठ्या उत्साहात करण्यात आले. ‘पुण्याचा विकास करायचा तर भाजपाच पाहिजे’ हे घोषवाक्य या प्रचार रथांवर झळकत असून, आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पक्षाचा विकासात्मक दृष्टिकोन नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात येणार आहे.
केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे, निवडणूक प्रमुख गणेश बिडकर, महाराष्ट्र प्रदेश महामंत्री राजेश पांडे, माजी आमदार व माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून प्रचार रथांचे उद्घाटन करण्यात आले.
भाजपाच्या झेंड्याच्या रंगसंगतीप्रमाणे भगव्या व हिरव्या रंगातील हे आकर्षक प्रचार रथ अत्याधुनिक एलईडी स्क्रीनने सुसज्ज आहेत. या माध्यमातून भाजपाने पुण्यासाठी केलेली विकासकामे, केंद्र व राज्य सरकारच्या योजना तसेच भविष्यातील विकासाची दिशा दृकश्राव्य स्वरूपात नागरिकांपर्यंत पोहोचवली जाणार आहे.
हे डिजिटल प्रचार रथ आगामी काळात पुणे शहरातील विविध भागांत फिरून भाजपाचा प्रचार व प्रसार करणार असून, मतदारांशी थेट संवाद साधण्याचे प्रभावी माध्यम ठरणार आहेत.