
पुणे, दि. 29 : विजयस्तंभ अभिवादनासाठी येणाऱ्या अनुयायी तसेच पुस्तक विक्री स्टॉल धारकांना आवश्यक त्या सर्व सोई-सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांची विशेष काळजी घेण्याच्या स्पष्ट सूचना महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य ॲड. गोरक्ष लोखंडे यांनी दिल्या.
हवेली तालुक्यातील पेरणे फाटा येथील विजयस्तंभ परिसरास भेट देऊन १ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या विजयस्तंभ अभिवादन सोहळ्याच्या पूर्वतयारीचा त्यांनी प्रत्यक्ष स्थळपाहणीद्वारे आढावा घेतला. यावेळी संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेण्यात आली.
या पाहणीदरम्यान समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) चे विभाग प्रमुख डॉ. बबन जोगदंड, लोणीकंद पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव कुंभार, स्थानिक पदाधिकारी व अनुयायी उपस्थित होते.
ॲड. लोखंडे म्हणाले, विजयस्तंभ परिसर ही क्रांतिकारी व ऐतिहासिक भूमी असून या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी देशभरातून अनुयायी येतात. या अनुयायांना उत्तम सोई-सुविधा मिळाव्यात, यासाठी स्थानिक प्रशासन, सामाजिक संस्था व नागरिक अहोरात्र जबाबदारीने काम करीत आहेत. बार्टी व समाज कल्याण विभागामार्फत सुमारे १५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून, त्याचा पुरेपूर व योग्य वापर होईल याची दक्षता घ्यावी.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून विजयस्तंभ अभिवादन सोहळा शांततापूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी अनुयायी व सामाजिक संघटनांनी पुढाकार घ्यावा. प्रशासन, सामाजिक संस्था व नागरिक यांच्यातील समन्वयातून हा सोहळा यशस्वी करावा, असे आवाहन त्यांनी केले.
विजयस्तंभ परिसरात एलईडी स्क्रीनच्या माध्यमातून संविधान विषयक माहितीपट दाखविण्यात यावा. महिलांसाठी उभारण्यात येणाऱ्या शौचालये व हिरकणी कक्षामध्ये सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. पुस्तक विक्री स्टॉल धारकांना जागा, वीज, पाणी, चटई, टेबल, जेवण व अल्पोपहारासह हिवाळा ऋतू लक्षात घेता निवारा कक्षाचीही व्यवस्था करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.
यंदा होणाऱ्या संभाव्य गर्दीचा विचार करता प्रशासनाने केलेल्या पूर्वतयारीबाबत समाधान व्यक्त करत, प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करून अनुयायांनी सहकार्य करावे, असे आवाहन ॲड. लोखंडे यांनी केले.
या पाहणीदरम्यान विजयस्तंभ सजावट, रुग्णवाहिका, आरोग्य केंद्र, स्वच्छता व्यवस्था, पिण्याच्या पाण्याचे टँकर, हिरकणी कक्ष, बस व्यवस्थापन, पुस्तक विक्री स्टॉल, शौचालये, वाहनतळ, रस्ते दुरुस्ती, कायदा व सुव्यवस्था, वाहतूक नियोजन, गर्दी नियंत्रण, पोलीस बंदोबस्त, सीसीटीव्ही, नियंत्रण कक्ष व मनुष्यबळ यासंदर्भात सविस्तर आढावा घेण्यात आला.