पुणे महापालिका निवडणूक : उमेदवारांसाठी ‘NOC’ आता ऑनलाईन; ३० डिसेंबर दुपारी १२ वाजेपर्यंत अर्जाची मुदत

पुणे दि. 29 : पुणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२५-२०२६ साठी प्रत्यक्ष मतदान दिनांक १५ जानेवारी २०२६ रोजी होणार आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत ३० डिसेंबर २०२५ असून, उमेदवारी अर्जासोबत आवश्यक असणारे ना हरकत प्रमाणपत्र (NOC) देण्यासाठी पुणे महानगरपालिकेने प्रथमच ऑनलाईन प्रणाली सुरू केली आहे.

मागील निवडणुकांमध्ये ना हरकत प्रमाणपत्र मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ लागत होते तसेच प्रक्रियेस विलंब होत असल्याने उमेदवारांना अडचणींचा सामना करावा लागत होता. ही अडचण दूर करण्यासाठी यंदाच्या निवडणुकीत महापालिकेने डिजिटल सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

या ऑनलाईन प्रणालीद्वारे पुणे महानगरपालिकेच्या एकूण ४१ खात्यांना एकत्रितपणे जोडण्यात आले असून, उमेदवाराचा अर्ज एकाच वेळी सर्व खात्यांकडे NOC साठी पाठवला जातो. यामुळे प्रक्रिया अधिक जलद व पारदर्शक होणार आहे.

नागरिक व इच्छुक उमेदवारांना थकबाकी नसल्याचे ना हरकत प्रमाणपत्र मिळवण्यासाठी खालील संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करता येणार आहे :
👉 https://nocelection.pmc.gov.in

सदर ऑनलाईन अर्ज स्वीकृतीची लिंक ३० डिसेंबर २०२५ रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत उपलब्ध राहणार आहे.
२९ डिसेंबर २०२५ पर्यंत प्राप्त होणाऱ्या अर्जांची प्राधान्याने पूर्तता करण्याचा प्रयत्न केला जाईल. मात्र, ३० डिसेंबर रोजी प्राप्त होणारे अर्ज विलंबाने आल्यास, संबंधित खात्यांकडून वेळेत ना हरकत प्रमाणपत्र न मिळाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी अर्जदारांची राहील, असे माहिती व जनसंपर्क कार्यालय, पुणे महानगरपालिका यांनी स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button