‘आवाज कुणाचा एसपी कॉलेजचा!’ – पुरुषोत्तम करंडक महाअंतिम फेरीत ‘आतल्या गाठी’ची बाजी

पुणे दि. 29 : महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित प्रतिष्ठित पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेच्या महाअंतिम फेरीत सर परशुरामभाऊ महाविद्यालय (एसपी कॉलेज), पुणे यांनी सादर केलेल्या ‘आतल्या गाठी’ या एकांकिकेने प्रथम क्रमांक पटकावत पुरुषोत्तम करंडकावर आपले नाव कोरले. विजेत्या संघास ₹५,००१ रोख, प्रशस्तीपत्र व स्मृतीचिन्ह प्रदान करण्यात आले.

तसेच सर्वोकृष्ट प्रायोगिक एकांकिका म्हणून रत्नागिरी येथील फिनोलेक्स ॲकॅडमी ऑफ मॅनेजमेंट ॲण्ड टेक्नॉलॉजी यांनी सादर केलेल्या ‘ठोंग्या’ या एकांकिकेला कुमार जोशी करंडक देण्यात आला. या संघास ₹४,००१ रोख, प्रशस्तीपत्र व स्मृतीचिन्ह प्रदान करण्यात आले.

निकाल जाहीर होताच स्पर्धकांनी
‘पुरुषोत्तम करंडक कुणाचा? एसपी वाल्यांचा!’, ‘आवाज कुणाचा एसपी कॉलेजचा’, ‘आले रे आले एसपी आले’
अशा घोषणांनी भरत नाट्य मंदिर दणाणून सोडले.

महाअंतिम फेरीचे आयोजन

पुरुषोत्तम करंडक स्पर्धेची महाअंतिम फेरी दि. २६ ते २८ डिसेंबर २०२५ दरम्यान भरत नाट्य मंदिर, पुणे येथे पार पडली. या फेरीत राज्यभरातून निवडलेल्या १७ संघांनी आपली एकांकिका सादर केली. निकाल व पारितोषिक वितरण समारंभ दि. २८ डिसेंबर रोजी पार पडला.

मान्यवरांची उपस्थिती

पारितोषिक वितरण ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांच्या हस्ते झाले. यावेळी महाराष्ट्रीय कलोपासकचे उपाध्यक्ष सुहास जोशी, परीक्षक चंद्रशेखर ढवळीकर, संजय पवार, अमित फाळके उपस्थित होते. स्पर्धेचा निकाल ॲड. राजेंद्र ठाकूरदेसाई यांनी जाहीर केला.

अन्य प्रमुख निकाल

सांघिक द्वितीय : ग्वाही – देशभक्त रत्नप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स, कोल्हापूर (श्रीराम करंडक)

सांघिक तृतीय : काही प्रॉब्लेम ये का? – अण्णासाहेब मगर महाविद्यालय, हडपसर, पुणे (पं. विद्याधर शास्त्री भिडे करंडक)

वैयक्तिक पारितोषिके

सर्वोकृष्ट अभिनय : अभिषेक हिरेमठस्वामी (ग्वाही)

अभिनय नैपुण्य (पुरुष) : पार्थ पाटणे

अभिनय नैपुण्य (स्त्री) : अक्षरा बारटक्के

सर्वोकृष्ट वाचिक अभिनय : शाश्वती वझे (आतल्या गाठी)

सर्वोकृष्ट दिग्दर्शन : अद्वय पुरकर, शाश्वती वझे, समर्थ खळदकर (आतल्या गाठी)

मार्गदर्शन व प्रतिक्रिया

स्पर्धकांना मार्गदर्शन करताना मोहन जोशी म्हणाले,
“नाट्य क्षेत्रात करिअर घडवायचे असेल तर चिकाटी सोडू नका. सातत्याने मेहनत करा.”

परीक्षक चंद्रशेखर ढवळीकर यांनी सांगितले की,
“तरुणांचे प्रश्न समजून घ्यायचे असतील तर राजकारण्यांनी पुरुषोत्तमच्या रंगमंचावरील एकांकिका पाहाव्यात.”
महाअंतिम फेरीतील एकांकिकांमध्ये उत्कृष्ट तालीम, नियोजन आणि कलाकारांची मेहनत ठळकपणे दिसून आली, असेही त्यांनी नमूद केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button