
पुणे दि. 29 : : महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करण्यास अवघे दोन दिवस शिल्लक असताना, संभाव्य उमेदवारांकडून प्रचाराला वेग आला आहे. पुणे महानगरपालिकेचे भाजपा निवडणूक प्रमुख गणेश बिडकर हे प्रभाग क्रमांक २४ — कसबा गणपती, कमला नेहरू हॉस्पिटल, केईएम हॉस्पिटल परिसरातून निवडणूक लढवणार आहेत.
गेल्या नऊ महिन्यांपासून बिडकर यांनी राबवलेले ‘नागरिक जनसंपर्क अभियान’ केवळ निवडणूक प्रचारापुरते मर्यादित न राहता, थेट नागरिकांच्या समस्या, अपेक्षा आणि सूचना यांच्याशी जोडले गेले आहे. या कालावधीत त्यांनी ६० हजारांहून अधिक नागरिकांशी प्रत्यक्ष भेट घेऊन संवाद साधला आहे.
दररोज किमान ६० ते ७० घरे आणि २५० ते ३५० नागरिकांना भेटण्याचा शिस्तबद्ध कार्यक्रम या अभियानांतर्गत राबवण्यात येत आहे. विशेष म्हणजे या जनसंपर्कात बिडकर यांच्या पत्नी गौरी बिडकर आणि कन्या पूर्वा यांचाही सक्रिय सहभाग आहे. त्यामुळे हा संवाद केवळ राजकीय न राहता, विश्वास आणि आपुलकीचा ठरत असल्याचे चित्र दिसत आहे.
प्रभागातील पाणीपुरवठा, आरोग्य सेवा, रस्ते, स्वच्छता, प्रशासकीय अडचणी यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर नागरिकांशी थेट चर्चा करून, त्यावर तात्काळ उपाययोजना करण्याचा प्रयत्न या अभियानातून करण्यात येत आहे. यामुळे बिडकर यांची ओळख “निवडणुकीपुरते दिसणारे उमेदवार” नव्हे, तर सातत्याने नागरिकांमध्ये राहणारे लोकप्रतिनिधी अशी अधिक ठळक होत आहे.
याबाबत बोलताना गणेश बिडकर म्हणाले,
“नागरिकांना भेटल्यानंतर त्यांच्या प्रतिक्रियांमधून मला माझ्या कामाचा थेट फीडबॅक मिळतो. तो माझ्यासाठी सर्वात मूल्यवान असतो. नागरिक आणि लोकप्रतिनिधी यांच्यात पारदर्शकता असली पाहिजे, असे माझे ठाम मत आहे. आत्तापर्यंत भेटलेल्या नागरिकांकडून मिळालेल्या प्रतिसादामुळे आपले काम नागरिकांपर्यंत पोहोचत आहे, याचे समाधान आहे.”