
पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास अवघे दोन दिवस उरले असताना, संभाव्य उमेदवारांकडून प्रचाराला वेग आला आहे. अशा पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेचे भाजपा निवडणूक प्रमुख गणेश बिडकर यांनी आपल्या नागरिक जनसंपर्क अभियानातून थेट जनतेपर्यंत पोहोचण्याचा वेगळा आदर्श उभा केला आहे.
प्रभाग क्रमांक २४ (कसबा गणपती – कमला नेहरू हॉस्पिटल – केईएम हॉस्पिटल) येथून निवडणूक लढवण्याच्या तयारीत असलेल्या गणेश बिडकर यांनी गेल्या नऊ महिन्यांत ६० हजारांहून अधिक नागरिकांशी प्रत्यक्ष भेट घेऊन संवाद साधला आहे. हे अभियान केवळ निवडणूक प्रचारापुरते मर्यादित न राहता, नागरिकांच्या रोजच्या समस्यांशी थेट जोडले गेले आहे.
दररोज किमान ६० ते ७० घरे आणि २५० ते ३५० नागरिकांना भेटण्याचा शिस्तबद्ध कार्यक्रम बिडकर सातत्याने राबवत आहेत. विशेष म्हणजे या जनसंपर्क अभियानात त्यांची पत्नी गौरी बिडकर आणि कन्या पूर्वा यांचाही सक्रिय सहभाग असून, त्यामुळे हा संवाद अधिक आपुलकीचा आणि विश्वासाचा ठरत आहे.
पाणीपुरवठा, आरोग्य सुविधा, रस्त्यांची दुरुस्ती, स्वच्छता, प्रशासकीय अडचणी यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर नागरिकांशी थेट चर्चा करून तात्काळ उपाययोजना करण्याचा प्रयत्न या अभियानातून केला जात आहे. त्यामुळे “निवडणुकीपुरते दिसणारे उमेदवार” न राहता, सातत्याने जनतेत राहणारे लोकप्रतिनिधी अशी बिडकर यांची ओळख अधिक ठळक होत आहे.
याबाबत बोलताना गणेश बिडकर म्हणाले,
“नागरिकांना भेटल्यावर त्यांच्या प्रतिक्रिया आणि फीडबॅक थेट मिळतो. तो माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचा असतो. नागरिक आणि लोकप्रतिनिधी यांच्यात पारदर्शकता असावी, असे माझे ठाम मत आहे. आतापर्यंत ज्या नागरिकांना भेटलो, त्यांच्याकडून मिळालेल्या प्रतिक्रियांमुळे आपले काम लोकांपर्यंत पोहोचत आहे, याचे समाधान वाटते.”