जन्मत: अडकलेल्या जबड्यावर यशस्वी शस्त्रक्रिया; मुलीकडून प्रशासनाप्रती कृतज्ञतेचा भावनिक ऋणनिर्देश

सांगली, दि. 28 : ईश्वरपूर येथील एका मुलीला जन्मत:च खालचा जबडा अडकलेला असल्याने तिला बोलता तसेच अन्नग्रहण करता येत नव्हते. अत्यंत खर्चिक आणि अवघड अशी ही शस्त्रक्रिया जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या घरेलु कामगार आरोग्य तपासणी शिबिराअंतर्गत यशस्वीरित्या पार पडली.

शस्त्रक्रियेनंतर सदर मुलीला आता अन्नग्रहण करता येऊ लागले असून बोलण्याच्या क्रियेलाही सुरुवात झाली आहे. या यशस्वी उपचारांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्या मुलीने आपल्या वडिलांसह जिल्हाधिकारी कार्यालयात विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची भेट घेतली.

यावेळी विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी मुलीची आपुलकीने विचारपूस करत तिच्या पुढील आरोग्याविषयी शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी जिल्हाधिकारी अशोक काकडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

ही शस्त्रक्रिया वसंतदादा पाटील दंत रुग्णालय, कवलापूर येथे पार पडली. या उपचारांसाठी डॉ. श्रीनिवास अष्टेकर, डॉ. सचिन मजती, डॉ. सुरेखा बेडसगावकर व डॉ. अनिरुद्ध पाटील यांच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमने महत्त्वाची भूमिका बजावली. विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी या वैद्यकीय टीमचे विशेष कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button